जळगाव पोलीस अधीक्षकांनी कर्तव्याच्या पलीकडे जपली माणुसकी
भुसावळातील दोन कुटूंबाकडे भेट देत केले सांत्वन : विश्वास अधिक झाला दृढ
भुसावळ (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची शिस्तप्रिय व तितकेच कणखर अधिकारी म्हणून ओळख आहे. जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी संवेदना जपण्याचे कामही केल्याचा प्रत्यय भुसावळकरांना आला. गत महिन्यात अपघाती मृत्यूमुळे दुःखात बुडालेल्या भुसावळातील दोन पोलीस कुटुंबीयांची अलीकडेच त्यांनी भेट घेत या कुटूबियांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला.
कुटूंबप्रमुख म्हणून जपली जवाबदारी
भुसावळ परिसरातील दोन पोलीस कुटुंबांवर सप्टेंबर महिन्यात दुःखाचा डोंगर कोसळला. पहिल्या घटनेत निवृत्त सहायक फौजदार प्रकाश आनंदा पाचपांडे यांचा 1 सप्टेंबर रोजी दुचाकी अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.





दुसर्या घटनेत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक फौजदार विजय नेरकर यांच्या मुलाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. डॉ.रोहित नेरकर हा गुजरातमध्ये एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना 21 सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलाच्या निधनाने नेरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
दुःखाच्या प्रसंगी एसपींची सांत्वनपर भेट
या दोन्ही घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नुकतीच संबंधित कुटुंबीयांची भेट घेतली. प्रकाश पाचपांडे यांच्या पत्नी व सेवानिवृत्त उपनिरीक्षक शैला पाचपांडे तसेच त्यांच्या दोन मुलांशी संवाद साधत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करीत परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
त्यानंतर विजय नेरकर यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. या कठीण काळात पोलीस दल त्यांच्या पाठीशी असल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या भेटीतून झाला.
कर्तव्याच्या पलीकडे जपली माणुसकी
पोलीस दलात काम करताना अधिकारी आणि कर्मचार्यांना अनेकदा स्वतःच्या कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. सण-उत्सव असोत किंवा कौटुंबिक कार्यक्रम, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदारीमुळे अनेकदा कर्तव्यालाच प्राधान्य द्यावे लागते. मनुष्यबळाची कमतरता आणि कामाचा वाढता ताण यामुळे कर्मचार्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत कर्मचार्यांच्या सेवा-सुविधांसोबतच त्यांच्या कौटुंबिक अडचणी आणि भावनिक गरजांची जाणीव ठेवणे महत्त्वाचे ठरते. वरिष्ठ अधिकार्यांनी कर्मचार्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांना धीर देणे आणि अडचणीच्या काळात आधार देणे यामुळे पोलीस दलातील परस्पर विश्वास अधिक दृढ होतो.
संवेदनशील अधिकार्यांची भूमिका नेहमीच चर्चेत
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे पोलीस कुटुंबीयांसोबतच सामान्य नागरिकांच्या अडचणींकडेही लक्ष देत असल्याचे अनेकदा त्यांच्या कृतीतून दिसून येते. उन्हात काम करणारे कष्टकरी, भाजीविक्रेते आणि फेरीवाले यांच्या अडचणींची जाणीव ठेवून त्यांना दिलासा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची भूमिका चर्चेत असते. गेल्या महिन्यात दोन पोलीस कुटुंबांवर ओढवलेल्या संकटाच्या वेळी धिवरे यांनी स्वतः भेट देऊन सांत्वन केले. या भेटींमुळे दुःख कमी होऊ शकत नसले, तरी अशा कठीण प्रसंगी आपले सहकारी आणि संपूर्ण पोलीस दल आपल्या पाठीशी उभे आहे, ही भावना कुटुंबीयांसाठी महत्त्वाची ठरते. कर्तव्य, शिस्त आणि कायदा-सुव्यवस्थेच्या जबाबदारीसोबतच सहकार्यांच्या दुःखात सहभागी होण्याची पोलीस अधीक्षकांची भूमिका पोलीस दलातील माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे.
