भुसावळातील खून प्रकरण : नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी जाणली माहिती
पीडीत कुटूंबाची भेट : तपासाधिकार्यांना केल्या सूचना
भुसावळ (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : उसनवारीचे 29 लाख रुपये परत न केल्याच्या वादातून शहरातील गोपाळ नगरातील 21 वर्षीय भूषण उल्हास व्हावळे या तरुणाची हत्या करून महामार्गावरील वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रस्त्यावर मृतदेह फेकण्यात आला होता. ही धक्कादायक घटना गुरुवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. खुनानंतरच्या दोन तासात दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात खुनानंतर अॅट्रासिटीचे कलम वाढवण्यात आल्याने नाशिक नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक (पीसीआर) प्रशांत बच्छाव यांनी मंगळवार, 13 रोजी शहरात भेट देत पीडीत कुटूंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी तपासाधिकार्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
पीडीत कुटूंबाची भेट घेत दिला धीर
भुसावळातील तरुण भूषण व्हावळे याने शेअर ट्रेडींगच्या नादात विविध ठिकाणाहून उसनवार पैसे घेतले होते शिवाय संजय आवटेसह अन्य दोघांकडूनही 29 लाख रुपये घेतले होते. पैसे परत न मिळाल्याने संशयीतांनी आवर्ट फार्म हाऊसवर बोलावून तरुणाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू होताच त्यास वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रोडवर फेकले होते. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून खुनासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी मंगळवारी भुसावळात भेट दिली. गोपाळ नगरस्थित मयताचा भाऊ विशाल उल्हास व्हावले तसेच आई उषा व्हावले यांच्याशी त्यांनी संवाद साधून खुनाचा घटनाक्रम जाणून घेतला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटूंबही अद्यापही दुःखातून सावरलेले नसल्याने त्यांना अधीक्षकांनी धीर दिला शिवाय अॅट्रासिटी अंतर्गत शासनाकडून मिळणार्या लाभाची यावेळी कुटूंबियांना माहिती देण्यात आली.





तपासाधिकार्यांना सूचना
पोलीस उपअधीक्षक कार्यालयात गुन्ह्याचे तपासाधिकारी पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक् राहुल वाघ यांना अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने काही सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी पीसीआर सहा.निरीक्षक रितेश राऊत, एएसआय प्रवीण ढाके, हवालदार जीवन पाटील, हवालदार जगदीश परदेशी आदींची उपस्थिती होती.
