वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा पाठपुरावा : वाघूर प्रकल्पाच्या पाणीवापर फेरनियोजनाला शासनाची मंजुरी !
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे आभार ; कुर्हेपानाचे उपसा सिंचनासाठी 11.33 तर शेंदुर्णी पाणीपुरवठ्यासाठी 2.47 दलघमी पाण्याची तरतूद
भुसावळ (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : जळगाव जिल्ह्यातील वाघूर मोठ्या पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेरनियोजनास महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. या निर्णयासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मंत्रालय स्तरावर संबंधित विभागाच्या अधिकार्यांसोबत आढावा बैठका घेऊन या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत या विषयावर वारंवार चर्चा करण्यात आली होती. या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाने बुधवार, 14 रोजी शासन निर्णय जारी करून वाघूर प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेरनियोजनास मंजुरी दिली आहे.
सिंचनासाठीच्या पाणी वापरात वाढ
वाघूर प्रकल्पाच्या मंजूर सातव्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार एकूण वार्षिक पाणीवापर 363 दलघमी आहे. नव्या फेरनियोजनानुसार सिंचनासाठीचा एकूण पाणी वापर 215.70 दलघमीवरून 227.030 दलघमी करण्यात आला आहे. यामध्ये कुर्हा पानाचे उपसा सिंचन योजना क्रमांक 1 व 2 साठी 11.330 दलघमी पाण्याची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.





एकात्मिक जलआराखड्यात बदल करण्याचे निर्देश
वाघूर प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेरनियोजनास मंजुरी देतानाच त्यानुसार एकात्मिक जलआराखड्यात आवश्यक ते बदल करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे कुर्हा पानाचे उपसा सिंचन आणि शेंदुर्णी शहर पाणीपुरवठा योजनेसाठीच्या पाणीवाटपाला सुधारित नियोजनात अधिकृत स्थान मिळाले आहे.
एकूण पाणीवापर 363 दलघमीच
शासन निर्णयातील परिशिष्ट-अनुसार वाघूर प्रकल्पाचा एकूण वार्षिक पाणीवापर 363 दलघमी इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. नव्या नियोजनात सिंचनासाठी 227.030 दलघमी, पिण्याच्या पाण्यासाठी 63.260 दलघमी, औद्योगिक वापरासाठी 9.780 दलघमी आणि बाष्पीभवनासाठी 62.930 दलघमी पाण्याची तरतूद आहे. भविष्यातील गरजांसाठी राखीव असलेले 13.800 दलघमी पाणी या फेरनियोजनात पूर्णपणे समायोजित करण्यात आले असून, त्यासाठीची स्वतंत्र राखीव तरतूद शून्य करण्यात आली आहे.
