भुसावळातील दोघे गुन्हेगार एक वर्षांसाठी हद्दपार


भुसावळ (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था मजबूत राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी भुसावळ पोलीस उपविभागाने कंबर कसली आहे. गुन्हेगारांविरोधात धडक मोहिम राबवण्यात येत असतानाच पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन संशयीतांना एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी काढले आहेत. या आदेशाने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नईम सलीम शेख (39) व शेख सलीम शेख सिकंदर अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दोन्ही संशयीत एक वर्षासाठी तडीपार
भुसावळच्या दिनदयाल नगर परिसरातील नईम सलीम शेख (39) विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनयभंग, दुखापत, मारहाण, जबरी चोरी आणि घातक शस्त्र बाळगणे यासारख्या गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यास हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रांताधिकार्‍यांनी संशयीताचे गुन्हेगारी वर्तुन व समाजाला असलेला धोका पाहता त्यास एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश बुधवारी काढले.






शेख सलीम शेख सिकंदरवरही हद्दपार
भुसावळच्या दिनदयाल नगरातील शेख सलीम शेख सिकंदर (55) याच्याविरुद्ध भुसावळ शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याच्यापासून सार्वजनिक शांतता व नागरिकांच्या सुरक्षेला बाधा निर्माण होत असल्याने त्यालादेखील जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आले. कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या नेतृत्वात भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी सादर केला.

सणोत्सव शांततेत पार पाडण्याचे पोलिसांचे आवाहन
नवरात्रोत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भुसावळ उपविभागातील पोलीस यंत्रणा सतर्क आहे. प्रतिबंधक कारवायांद्वारे संभाव्य अनुचित घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कलम 126 अंतर्गत 37 तर कलम 129 अंतर्गत पाच व बीएनएसएस कलम 163 अंतर्गत 55 कारवाया करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !