खानदेशातील बोलीभाषेचे जतन व संवर्धनासाठी विद्यापीठात खानदेशी बोलीभाषा केंद्र सुरू करणार : मराठी भाषा मंत्री उदय सामंत
जळगाव (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि खानदेशातील बोलीभाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बोलीभाषा केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी मराठी भाषा विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत दिली. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह-2026’च्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. विद्यापीठातील ए.पी.जे.अब्दुल कलाम भवनात हा सोहळा उत्साहात पार पडला.
यांची मंचावर उपस्थिती
यावेळी मंचावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.प्रवीण महाले आणि भाषा व विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे उपस्थित होते.





खानदेशी साहित्य संमेलन आयोजित करणार
मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, खानदेशातील समृद्ध बोलीभाषांचे जतन करण्यासाठी यंदापासून खानदेशी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषांचा शब्दसंग्रह तयार करण्याचे काम मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात येईल. मराठी भाषेत संशोधनाला प्रोत्साहन देण्याची गरज असून, विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र साहित्य संमेलनांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिची प्राचीनता, समृद्ध साहित्यिक परंपरा आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील योगदान अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात बोलीभाषा केंद्र सुरू करून खानदेशातील भाषिक वारसा जतन करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळने घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्जाची बँकांकडून सक्तीने वसुली झाल्यास शासन कठोर भूमिका घेईल असेही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
मराठी भाषा म्हणजे संस्कार, अस्मिता अन् संस्कृती : कुलगुरू माहेश्वरी
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी म्हणाले, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून आपल्या संस्कारांची, अस्मितेची, संस्कृतीची आणि भावविश्वाची भाषा आहे. जगातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी विविध भाषा शिका; मात्र मातृभाषेचा अभिमान बाळगून तिचे संवर्धन करा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या प्राचीनतेला आणि समृद्ध साहित्यिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी बोलीभाषा केंद्र आणि संशोधन केंद्र स्थापन करून बहिणाबाईंचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडण्याचा मानस असल्याचेही कुलगुरूंनी सांगितले. या उपक्रमांसाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने जिंकली मने
सांगता सोहळ्यानंतर आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. सुप्रसिद्ध गायक डॉ. अभिजित कोसंबी आणि प्रसन्नजीत कोसंबी यांच्या गायनाने, तसेच अभिनेते दिगंबर नाईक यांच्या अभिनयाने कार्यक्रमात रंगत आणली. नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे आणि त्यांच्या 60 कलाकारांच्या समूहाने सादर केलेल्या बहारदार नृत्याविष्काराने कार्यक्रमाची शोभा वाढवली. ‘माझी माय सरस्वती’ या बहिणाबाईंच्या गीताने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. अभिजित कोसंबी यांनी ‘मोरया मोरया’ हे गणपती बाप्पावरील गीत सादर केले. ‘भेटला विठ्ठल माझा’, ‘वासुदेव आला’, बळीराजा, वारी, दिंडी आणि आदिवासी नृत्य अशा विविध सादरीकरणांतून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. प्रास्ताविक राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे यांनी केले. सूत्रसंचालन खेमराज पाटील तर आभार भाषा व विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी मानले.
