भुसावळात टीईटीग्रस्त शिक्षकांची जोरदार सभा : सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सामूहिक निर्णय
प्र.ह.दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची एकजूट ; एसएलपी दाखल करण्याबाबत चर्चा
भुसावळ (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : टीईटीसंदर्भात छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याच्या दृष्टीने भुसावळ येथे टीईटीग्रस्त शिक्षकांची महत्त्वपूर्ण सभा झाली. माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही सभा झाली.
कायदेशीर लढ्यावर चर्चा
या सभेला जळगाव जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक तालुक्यातून शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीईटीसंदर्भातील न्यायालयीन निर्णयानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि पुढील कायदेशीर लढ्याची दिशा यावर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.





प्र.ह.दलाल यांचे दीड तास मार्गदर्शन
सभेत प्र.ह.दलाल यांनी खंडपीठाच्या निर्णयाचे विविध पैलू स्पष्ट करत पुढील कायदेशीर कार्यवाही कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी संबंधित न्यायालयीन निवाड्यांचे संदर्भ दिले. सुमारे दीड तास चाललेल्या या मार्गदर्शनानंतर उपस्थित शिक्षकांनी विविध शंका उपस्थित केल्या. दलाल यांनी त्यांचे निरसन करून पुढील कार्यवाहीसंदर्भात माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयात एकत्रीतपणे जाण्याचा निर्णय
सभेत उपस्थित शिक्षकांनी प्र.ह.दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रीतपणे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. टीईटीसंदर्भातील प्रश्नावर स्वतंत्रपणे प्रयत्न करण्याऐवजी सामूहिक पातळीवर कायदेशीर लढा उभारण्याची भूमिका या वेळी मांडण्यात आली. दरम्यान, बीड, छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील काही शिक्षकही या समूहात सहभागी होणार असल्याचे त्यांनी दूरध्वनीद्वारे कळविल्याची माहिती सभेत देण्यात आली. त्यामुळे या प्रश्नावर विविध भागांतील शिक्षकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची शक्यता आहे.
शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
प्रास्ताविक रावेर तालुक्यातील प्रवीण धुंडले यांनी केले. व्यासपीठावर लोखंडे सर, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक व शिक्षक समन्वय समितीचे नेते तुळशीराम सोनवणे, पी.जे.पाटील, गौरव भोळे, एजाज (जामनेर), मनिषा पायघन, बोरोले, डोळे आदी उपस्थित होते. टीईटीसंदर्भातील न्यायालयीन निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करून पुढील कायदेशीर पावले उचलण्यासाठी शिक्षकांनी एकत्र येण्याची भूमिका या सभेतून स्पष्ट केली. आता सर्वोच्च न्यायालयातील संभाव्य कायदेशीर प्रक्रियेच्या पुढील घडामोडींकडे संबंधित शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
