दिवसा घरफोडी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा धुळे गुन्हे शाखेकडून पर्दाफाश : दोघांना अटक
पाच लाख 69 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त : चोरीचा मुद्देमाल घेणार्या कारागीरालाही अटक
धुळे (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : धुळे शहरात दिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरणार्या आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण पाच लाख 69 हजार 450 रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींनी चोरीनंतर सोने मध्यप्रदेशातील सराफाला विकल्यानंतर त्यासदेखील आरोपी करीत अटक करण्यात आली.
धुळ्यात झाली होती घरफोडी
धुळ्यातील प्रणय राजेंद्र खंडेलवाल (रा.शिव वसंत अपार्टमेंट, राधे राधे अपार्टमेंटसमोर, शिंदे नगर, धुळे) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या घटनेत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून चार लाख 12 हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला होता. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. समांतर तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना हा गुन्हा आंतरराज्यीय टोळीतील गुन्हेगारांनी केल्याचे निष्पन्न झाले.





मध्यप्रदेशातून आरोपीला अटक
गुन्हे शाखेला तपासादरम्यान मध्यप्रदेशातील अक्रम अब्दुल गफ्फार अब्बासी (45, रा.98, श्रीनगर काकड, एम.आय.जी. इंदौर, मध्यप्रदेश) व त्याचा भाऊ जावेद अब्दुल गफार अब्बासी (रा.मदीना नगर, आजादनगर, इंदौर, मध्यप्रदेश) यांनी घरफोडी केल्याचे स्पष्ट होताच अक्रमला ताब्यात घेताच त्याने घरफोडीतील मुद्देमाल शेख बासेद शेख सबूर (51, रा.77/1, रजपाली मार्ग, देवास, ता.नाहर दरवाजा, मध्यप्रदेश) यास विकल्याची कबुली दिल्यानंतर सराफा कारागीराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दागिन्यांची लगड बनवल्याची कबुली दिली. दरम्यान, या गुन्ह्यातील जावेद अब्दुल गफार अब्बासी हा अद्याप पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
पाच लाख 69 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून 71 हजार रुपये किंमतीचे सहा ग्रॅमचे सोन्याचे टोंगल, तीन लाख 30 हजार 750 रुपये किंमतीची 25 ग्रॅमची लगड तसेच एक लाख 67 हजार 700 रुपये किंमतीची 1300 ग्रॅम चांदीची लगड मिळून पाच लाख 69 हजार 450 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक दीपक ढोके, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, उपनिरीक्षक धनंजय मोरे, अंमलदार प्रल्हाद वाघ, दिनेश परदेशी, देवेंद्र ठाकूर, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, अमोल पाटील, अमोज जाधव, सिद्धार्थ निकम आदींच्या पथकाने केली.
