जळगावात अपघातांची मालिका कायम : ट्रकच्या धडकेने ओसवाल वित्तीय कंपनीतील शाखाधिकारी ठार
जळगाव (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 35 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र छबुलाल चौधरी असे मृताचे नाव आहे. ते एका खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरक्षा आणि अवजड वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कामावर जात असताना अपघात
जळगाव शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास रवींद्र छबूलाल चौधरी (35, मूळ रा.उत्राण, ता.एरंडोल, ह.मु.चंदूअण्णानगर, जळगाव) हे हिरो एचएफ डिलक्स दुचाकी (एम.एच.19 डी.एन.1282) ने कामावर जात असताना ट्रक (आर.जे.50 जी.ए. 9234) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.





पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. अपघातात सहभागी ट्रक आणि दुचाकी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
कुटुंबाचा आधार हरपला
रवींद्र चौधरी हे मोतीलाल ओसवाल या खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई असा परिवार आहे. कुटुंबाचा आर्थिक आधार असलेल्या चौधरी यांचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि सहकार्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तरसोद बायपासची वाहतूक वळविल्यानंतर जळगाव शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण आणि अपघातांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आकाशवाणी उड्डाणपुलावरील या अपघातामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. संबंधित यंत्रणांनी उड्डाणपुलावरील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
