दीपनगर प्रकल्पाच्या मुख्य अभियंतापदी प्रफुल्ल भदाणे ; विराज चौधरींची अवघ्या सात महिन्यात बदली

महाजनकोतील तीन मुख्य अभियंत्यांच्या प्रशासकीय बदल्या ; भुसावळसह कोराडी आणि मुंबईत महत्त्वाचे फेरबदल


गणेश वाघ
भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : दीपनगर प्रकल्पात अवघ्या सात महिन्यांपूर्वीच रुजू झालेले व अत्यंत प्रामाणिक व शिस्तप्रिय अधिकारी असलेल्या विराज चौधरी यांची कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात बदली करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चौधरी यांच्या जागी मुंबई मुख्य कार्यालयातील मध्यवर्ती खरेदी विभागाचे प्रफुल्ल निंबा भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भदाणे यांनी यापूर्वीही येथे सेवा बजावली आहे.

अवघ्या सात महिन्यात विराज चौधरींची बदली
अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या राजेश मोराळे यांच्या बदलीनंतर मुंबई मुख्यालयातून विराज चौधरी यांची 1 एप्रिल 2026 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. अत्यंत प्रामाणिक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या चौधरी यांच्या काळात सुरळीत वीज निर्मितीसह कुठलाही गैरव्यवहार झाल्याची तक्रार समोर आली नाही. तब्बल 259 कोटी रुपयांच्या बेकायदा कामांना चौधरींनी ब्रेक लावल्याने ठेकेदार लॉबीतून त्यांच्या बदलीचा घाट घातला जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती तर 20 वर्षांपासून निवासस्थाने बळकावणार्‍या तथाकथित ठेकेदारांची चौधरी यांनी निवासस्थानी रिकामे केल्याने खळबळ उडाली होती. सदैव महानिर्मितीचे हित जोपासणार्‍या चौधरी यांची अवघ्या सात महिन्यात बदली करण्यात आल्याने कर्मचारी व अधिकारी वर्गातून नाराजी पसरली आहे.






प्रफुल्ल भदाणे आता दीपनगरचे नूतन अभियंता
महानिर्मितीचे कार्यकारी संचालकांनी गुरुवारी तीन अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून त्यात भुसावळचे मुख्य अभियंता विराज कृष्णराव चौधरी यांची कोराडी केंद्रात बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागेवर मुंबई मुख्यालयातून प्रफुल्ल निंबा भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भदाणे यापूर्वीदेखील दीपनगर प्रकल्पात अभियंता म्हणून कामकाज पाहिले आहे. कोराडी औष्णिक केंद्राचे सुदीप रघुनाथ राणे यांची तांत्रिक व दक्षता विभाग, मुख्य कार्यालय, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश
संबंधित मुख्य अभियंत्यांना कार्यमुक्त करून त्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश आणि रुजू अहवाल संबंधित कार्यालयात पाठविण्याच्या सूचना बदली आदेशात देण्यात आल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !