उजेड पेरणारी माणसं ‘विचार, प्रेरणेची दिवटी’ ; सुवर्णा पाटील
भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : आपल्या अवती-भवती निर्व्याज भावनेतून काम करणारी माणसं वावरत असतात. ती कशाचाही लोभ न बाळगता चालत राहतात. अशा माणसांना अंधार भेदून प्रकाशात आणण्याचा छोटासा प्रयत्न म्हणजे ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक होय. पुण्याच्या पेन पब्लिशिंग हाऊसने आनंदा पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली ही साहित्यकृती प्रकाशित केली आहे. त्यात 84 व्यक्तिचित्रणांचा समावेश आहे. प्रत्येक व्यक्ती नवप्रेरणेचा स्त्रोत आणि विचारांची दिवटी म्हटलं तर वावगं ठरू नये, असा अभिप्राय पुण्यातील सखी पुस्तक सखी सुवर्णा पाटील यांनी कळवला आहे.
केवळ पुरस्काराने पोट भरत नाही, हे विदारक सत्य मांडत, जीवन जगण्यासाठीचा रोजचा संघर्ष आणि कष्टाने पोट भरण्याचा वसा घेतलेले कणखर व्यक्तिमत्त्व म्हणजे फेसाटीकार नवनाथ गोरे हे होय. त्यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाला तो क्षण…आई-बापांबरोबर जगताना, कष्ट करताना आलेला तो प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.





बाल वाचकांना वाचनाचा लळा लावणारी 100हून अधिक पुस्तके लिहिणारे साहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव आणि लुप्त लिपींच्या संशोधन कार्याचा चिरंतन नंदादीप प्रज्वलित ठेवणारे भाषा संवर्धक विनायक पाटील यांच कार्य वाचताना संशोधन किती ताकदीचे हवे याची परिचिती येते. अस्सल गावरान भाषा आणि उपजत गोष्टीवेल्हाळपणाचा चपखल उपयोग करत, कथाकथनाच्या प्रयोगांचा एक हजाराचा टप्पा ओलांडणारे प्रा.व.पु.होले यांचे कामही पथदर्शी आहे.
कटू-गोड अनुभवांची शिदोरी असलेल्या 50 ते 60 डायर्या व शेकडो पदके ठेवलेली लोखंडी पेटी आणि प्रमाणपत्रांची कापडी पिशवी… हीच खान्देशातील धावपटू आर.बी.भंवर यांची संपत्ती. गडगंज संपत्ती असलेल्यांनी या खेळाडूला आर्थिक मदत करताना अनास्था दाखवली, परंतु पन्नासहून अधिक वर्षे धावण्याचा सराव सुरू ठेवत ते पदकांचे बादशहा ठरले. त्यांचा हा प्रवास वाचताना वाचक थक्क होतो.
हिरव्यागार भावनेतून आणि कसदार लेखणीतून साहित्यधन प्रसवणार्या शब्दसखी विमल सुरवाडकर हे व्यक्तिचित्रणही लोभस आहे. लेखकाने त्यासाठी जे भाषासौष्ठव वापरले आहे ते खिळवून ठेवते. अभिनयाच्या तंत्र-कौशल्याची उत्तम जाण, अस्खलित संवाद पाठांतर, हसतमुख चेहरा आणि आठ ते दहा तास नाटकाचा सराव करण्याची जिद्द असणार्या प्रख्यात नाट्यसेविका कल्पना कोल्हेंचा प्रवासही थक्क करणारा आहे.
भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीचे पाठराखण करणारे एक समृद्ध पर्व, लोक-संवादी एक्सप्रेस रवी सुपेकर, कबड्डी महर्षी अरुण मांडळकर, वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणार्या राजेश्री सुरवाडे, वैशाली झाल्टे, नाट्यकर्मी जयश्री पुणतांबेकर, तरुण तबलावादक तेजस नेमाडे यांचा जीवनप्रवास प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
पुस्तकातील उजेड पेरणार्या माणसांच्या कथा वाचकांना जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा नक्कीच देतील. या दीपस्तंभांना उजेडात आणून लेखकाने फार महत्त्वाचे कार्य केले आहे. म्हणून या पुस्तकास व लेखकास पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा.
