भुसावळ पालिकेची जीर्ण संकुल नागरिकांच्या जीवावर : मुन्सिपल कॉम्प्लेक्सचा सज्जा कोसळला !
सुदैवाने जीवितहानी टळली ; चारचाकी व दोन दुचाकींचे नुकसान, जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील नगरपालिकेच्या सुमारे 50 वर्षे जुन्या मुन्सिपल कॉम्प्लेक्सच्या दुसर्या मजल्यावरील जीर्ण सिमेंट काँक्रीटचा सज्जा गुरुवारी, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. मोठा आवाज आणि धुराचे लोट यामुळे परिसरातील दुकानदार व नागरिकांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने जीवितहानी टळली. मात्र एका चारचाकी वाहनासह दोन दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या व्यापारी संकुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मोठा आवाज ; दुकानदारांमध्ये घबराट
मध्यवर्ती बाजारपेठेतील मुन्सिपल कॉम्प्लेक्स सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून, सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी त्यावर दुसरा मजला तयार करण्यात आला होता. या मजल्यावरील पॅरापेटचा भाग जीर्ण झाल्याने तो अचानक कोसळला. वैशाली प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानाच्या वरील भागातील सिमेंट काँक्रीट खाली पडल्याने मोठा आवाज झाला आणि धुराचे लोट पसरले. त्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांसह संबंधित दुकानातील दुकानदारही घाबरले.





गर्दी नसल्याने अनर्थ टळला
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेतील दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे सकाळी अनेक दुकाने उघडण्यास उशीर होतो. घटना घडली त्या वेळी परिसरात गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. काँक्रीटचे तुकडे शेजारील सोडा विक्रेत्याच्या चारचाकी वाहनावर पडल्याने त्याचे किरकोळ नुकसान झाले, तर दोन दुचाकींचेही नुकसान झाले.
महात्मा गांधी संकुलातही घडली होती घटना
जुन्या व्यापारी संकुलांच्या दुरवस्थेचा प्रश्न यापूर्वीही समोर आला आहे. शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरील डी.एस. हायस्कूलला लागून असलेल्या महात्मा गांधी संकुलाच्या वरच्या मजल्यावरील जीर्ण पॅरापेटचा काही भाग दुकानांच्या छतावर कोसळला होता. त्या घटनेतही जीवितहानी झाली नव्हती मात्र एका दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले होते.
अन्य व्यापारी संकुलांचीही दुरवस्था
मुन्सिपल कॉम्प्लेक्सच्या शेजारील स्वर्गीय छबीलदास काळू चौधरी कपडा मार्केटचीही अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या स्थितीबाबतही सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे. या संकुलांमध्ये दररोज व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे नगरपालिकेने आपल्या मालकीच्या जुन्या व्यापारी संकुलांची तातडीने तांत्रिक तपासणी करून धोकादायक भागांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही गरजेचे असून दोन संकुलांतील घटनांनंतर तरी नगरपालिका जागी होणार का? असा प्रश्न व्यापारी आणि नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
