साक्री पंचायत समितीत ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा

आमदार मंजुळा गावित यांची प्रमुख उपस्थिती ; ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयावर भर


साक्री, जि.धुळे (शनिवार, 16 ऑक्टोबर 2026) : गावा-गावांत आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे आणि नागरिकांना आरोग्य सेवांशी जोडण्याच्या उद्देशाने साक्री पंचायत समितीच्या वतीने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाबाबत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. साक्री पंचायत समितीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांची होती उपस्थिती
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी मोनाली खेमनार होत्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हितेश गायकवाड यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.






ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयावर भर
मार्गदर्शन करताना सहाय्यक गटविकास अधिकारी मोनाली खेमनार यांनी सांगितले की, या कार्यशाळेमुळे साक्री तालुक्यातील गावांमध्ये आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना एकत्रितपणे काम करण्याची संधी मिळणार आहे. गावपातळीवर आरोग्यविषयक सुविधांचा प्रभावी वापर आणि जनजागृती वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

समन्वय राखणे गरजेचे
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हितेश गायकवाड यांनी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वय साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले. गावागावांत आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे, नागरिकांना उपलब्ध आरोग्य सेवांची माहिती देणे आणि त्यांना या सेवांशी जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून गावांना अधिक आरोग्यदायी बनविण्यासाठी स्थानिक पातळीवर योग्य नियोजन करणे, विविध विभागांचा सहभाग वाढविणे आणि नागरिकांचा सक्रिय लोकसहभाग मिळविणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विविध गावांचे सरपंच आणि आरोग्य अधिकारी उपस्थित
या कार्यशाळेला बसरावळच्या सरपंच कुमारी प्रियंका शिवाजी बारिश, वाकीच्या सरपंच श्रीमती जयश्री गोकुळ अहिरे, घोडदेच्या सरपंच श्रीमती अंजना कांतीलाल पवार आणि किरवाडेचे सरपंच श्री. संतोष भिल यांच्यासह विविध गावांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी डॉ.विजय गौड, डॉ.राहुल पवार, डॉ.नयना भालेराव, डॉ.प्रताप गावित, डॉ.प्रेमराज चव्हाण, डॉ.राजेश चौधरी, डॉ.प्रसाद सोनजे, डॉ. रुची बडगुजर, डॉ.लीना जाधव आणि डॉ.बाळू चौधरी यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. याशिवाय साक्री तालुक्याचे एकात्मिक बालविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, मुख्य सेविका आणि आरोग्य सेवक यांनीही कार्यशाळेत सहभाग घेतला. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून गावपातळीवर आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, तसेच नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करावी, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !