भुसावळातील महाकाली मंदिरात 501 दिवे आणि 111 कलश स्थापित
नवरात्रीदरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
भुसावळ (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने बालयोगी गेंदानाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर रोडवरील श्री नवशक्ती ध्वजेश्वरी महाकाली मंदिरात 501 दिवे आणि 111 कलश स्थापित करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या या धार्मिक विधीमुळे मंदिर परिसरात भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महामंडलेश्वर श्री जनार्दन महाराज, उद्योजक मनोज बियाणी, अभियंता रोनक बियाणी, डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी बालयोगी गेंदानाथ महाराजांनी देवी कालीची पूजा केली. भुसावळ शहरात सुख,शांती व समृद्धी लाभो तसेच सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. नवरात्री दरम्यान, मंदिरात श्री नवशक्ती मनोकामना ज्योती कलश घटांची स्थापना आणि गौरी-गणेश पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गाष्टमीनिमित्त विशेष पूजा, संकट माता सुहागन पूजा, कन्याभोजन आणि हवन-आरतीचे आयोजन दररोज केले जाते.





24 ऑक्टोबर रोजी गोंधळ जागरण व भंडारा
माँ महाकाली अंबाबाईसाठी भव्य गोंधळ जागरण शनिवार, 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत भंडारा होणार आहे. मंदिरातील कार्यक्रमांमध्ये दुपारी 12 वाजता आरती व संध्याकाळी 7.30 वाजता संकट माता सुहागन पूजन तर पंचमीला शृंगार पूजा व पंच आरती दर्शन, सप्तमीला दुपारी 12 वाजता कन्याभोजन आणि आरती संध्याकाळी 7.30 वाजता होईल. दुर्गाष्टमीला सायंकाळी 7.30 वाजता महाकाली पूजा आणि आरती होईल. रात्री 11 ते मध्यरात्रीपर्यंत हवन होईल. महानवमी आणि विजयादशमीला सायंकाळी 7.30 वाजता महाआरती होईल. या व्यतिरिक्त 22 जानेवारी रोजी मंदिराच्या आवारात श्री राम-जानकी विवाह सोहळा आयोजित केला जाईल. सर्व धार्मिक कार्यक्रम श्री श्री 1008 बालयोगी बाबा गेंदानाथ/ देविनाथ महाराज (पीठाधिश्वर, काली माता मंदिर) यांच्या मार्गदर्शनाखाली, धीरज पंडित आणि संतोष गुप्ता भगत यांच्या समन्वयाने आयोजित केले जात आहेत.
