भालोद उर्दू शाळेच्या रुकीय्या कुरेशी यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल ; उद्या नाशिकमध्ये पुरस्कार वितरण
भुसावळ (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : जिल्हा परिषद उर्दू शाळा, भालोद येथील प्रभारी मुख्याध्यापिका तथा पदवीधर शिक्षिका रुकीय्या बी. गुलाम दस्तगीर कुरेशी यांची अॅस्पायर फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणार्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली. या पुरस्काराचा वितरण सोहळा रविवार, 18 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता नाशिकच्या नांदूर नाका परिसरातील संजीवनी ए.सी. बँक्वेट हॉल अॅण्ड लॉन्समध्ये होत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात योगदान
रुकीय्या कुरेशी या गेल्या 35 वर्षांपासून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान दिले आहे. सध्या त्या जिल्हा परिषद उर्दू शाळा, भालोद येथे प्रभारी मुख्याध्यापिका तसेच पदवीधर शिक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अध्यापनासोबतच शाळेच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्या कार्यरत आहेत.





दरम्यान, पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर रुकीय्या बी. गुलाम दस्तगीर कुरेशी यांच्यावर शिक्षकवर्ग, सहकारी, परिचित आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
