मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी : चार लाखांच्या गुटख्यासह दोघे जाळ्यात
मुक्ताईनगर (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असताना मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करीत होंडा सिटी कारसह तीन लाख 95 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष अडसुळे यांना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधला. बर्हाणपूण-मुक्ताईनगर महामार्गावरील हॉटेल आरंभ समोर शुक्रवार, 16 रोजी सकाळी 10.15 वाजता नाकाबंदी करण्यात आली. संशयीत होंडा सिटी कार (एम.एच.16 आर
4575) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधीत गुटखा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. पोलिसांनी गजानन राजेंद्र पाटील (26, रा.मेळसावंगी, ता. मुक्ताईनगर) व भारत उत्तम भोई (23, रा. मेंढोळदे, ता.मुक्ताईनगर) यांना अटक केली.





वाहनासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत विमल पानमसाल्याची पाकिटे आणि व्ही-1 बिग तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रतिबंधित पदार्थांची एकूण किंमत एक लाख 80 हजार 740 रुपये तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन लाख 15 हजार रुपये किमतीची होंडा सिटी कारही पोलिसांनी जप्त केली आहे. प्रतिबंधित पदार्थ आणि वाहनाची एकत्रित किंमत तीन लाख 95 हजार 740 रुपये इतकी आहे. अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांनी फिर्याद दिल्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील करीत आहेत.
