भुसावळात काँग्रेसचे ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी ; मतदार यादीतील पारदर्शकता आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर भर


भुसावळ (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : मतदार यादीतील पारदर्शकता, मतदान प्रक्रियेची निष्पक्षता आणि लोकशाहीचे संरक्षण या मागण्यांसाठी भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ शनिवारी दुपारी तीन ते पाच दरम्यान आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली.

पारदर्शक पद्धत्तीने व्हाव्यात निवडणुका
भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश असून, भारतीय संविधानाने प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत असणे, मतदानाचा अधिकार सुरक्षित राहणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पडणे आवश्यक असल्याची भूमिका काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली.






मतदार यादीतील त्रृटी दूर करण्याची मागणी
मतदार यादीतील संभाव्य त्रृटी, पात्र मतदारांची नावे वगळली जाणे, दुबार नोंदी आणि मतदारांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण न होणे यांसारख्या मुद्द्यांवर आंदोलनादरम्यान लक्ष वेधण्यात आले. मतदार यादीची नियमानुसार सखोल पडताळणी करावी, चुकीने वगळलेल्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, तसेच दुबार नोंदी आणि संभाव्य अनियमिततांची चौकशी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती आणि नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी, मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे पुराव्यांसह निदर्शनास आल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाने कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच पात्र नागरिकांना मतदार यादीतील आपल्या नावाची पडताळणी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी, असेही काँग्रेसच्या वतीने नमूद करण्यात आले.

काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
या आंदोलनात भुसावळ शहर काँग्रेस अध्यक्ष अहमद इब्राहिम कुरेशी, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष मो.मुनव्वर खान, डॉ. राजेश मानवतकर, जिल्हाध्यक्ष (एससी विभाग) अ‍ॅड.कैलास शेडके, रहिम कुरेशी, सुधाकर बडगुजर, ईस्माईल पहेलवान, विलास खरात, संजय खडसे, जकपाल सिंह गील, सागर वानखडे, इम्रान खान, एनएसयूआय शहराध्यक्ष ऋषी खरारे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सुदर्शन इंगळे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष यास्मीन बानो, राणी खरात, नगरसेविका आलमा बानो, सुलताना अहमद कुरेशी, नाजमीन कुरेशी आणि लीना तल्लारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !