भुसावळातील भूमी अभिलेखच्या लाचखोर शिपायासह सायबर कॅफे चालकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी
शेतजमिनीच्या मोजणीतील त्रृटी दूर करण्यासाठी स्वीकारली होती एक हजारांची लाच
भुसावळ (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : शेतजमिनीच्या मोजणी प्रकरणातील त्रृटी दूर करण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शहरातील खाजगी सायबर कॅफे चालकासह भुसावळ भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी अटक केली होती. अटकेतील आरोपींना शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने 19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शिपाई सचिन किसन पाटील (45, प्लॉट क्रमांक सात, निवृत्ती नगर, मुक्ताईनगर) व सायबर चालक राकेश रामदास चव्हाण (43, रा.प्लॉट नंबर 19, तापी नगर, भुसावळ) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दुष्काळात शेतकर्याची अडवणूक
लाच प्रकरणातील 36 वर्षीय तक्रारदार नोकरदार असून मूळ तक्रारदाराची गोजोरे, ता.भुसावळ शिवारात शेतजमीन आहे. या शेतजमिनीच्या मोजणी संदर्भात 5 सप्टेंबर रोजी यावल रोडवरील राष्ट्रपिता गांधी पुतळ्यासमोरील चव्हाण सायबर कॅफेद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यात आला व दोन हजारांचे ऑनलाईन चलन भरण्यात आले. 30 सप्टेंबर 2026 रोजी तक्रारदाराला मोजणी प्रकरणात त्रृटी असलेल्याबाबत टेक्स मेसेज आल्यानंतर त्यांनी राकेश चव्हाण यास फोन केला असता त्याने लोकसेवक सचिन पाटील यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगून तुझे काम होवून जाईल, असे सांगितले होते. जळगाव एसीबीकडे तक्रारीनंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास चव्हाण याने नेहते हॉस्पीटलजवळ एक हजारांची लाच स्वीकारली व त्यानंतर त्याच्यासह शिपाई सचिन पाटील यालादेखील अटक करण्यात आली.





भूमी अभिलेखच्या वरिष्ठांसह अधिकार्यांची होणार चौकशी
जळगाव एसीबीतर्फे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी
न्यायाधीश श्रीमती पी.व्ही.पाटील यांच्या न्यायासनापुढे आरोपींनी लाच मागितल्यानंतर काम होवून जाईल, असे सांगितले असून त्यांचा भुसावळ कार्यालयातील कोणत्या वरिष्ठ वा कनिष्ठ अधिकार्यांशी संवाद झाला आहे? याची चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारतर्फे सरकारी वकील अॅड.मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने 19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
