कोलकाता चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू ; पाच गंभीर, 25 जखमी
गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट ; पूजा आयोजकांसह सात जणांना अटक ; घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन
कोलकाता (रविवार, 18 ऑक्टोबर 2026) : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील चोरबागन परिसरात दुर्गापूजेच्या मंडपात शनिवारी रात्री झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. जखमींवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पाच जणांची प्रकृती असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी पूजा समितीच्या पदाधिकार्यांसह सात जणांना अटक करीत त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. पश्चिम बंगाल सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
पूजा मंडपातील गर्दीमुळे दुर्घटना
चोरबागन येथील दुर्गापूजा मंडपात दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. मूर्तीसमोर छायाचित्रे काढण्यासाठी लोक थांबत असल्याने गर्दी वाढत गेली. परिणामी, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला असून, 25 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपोलो रुग्णालयासह शहरातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे.





पूजा समितीच्या पदाधिकार्यांसह सात जणांना अटक
या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यामध्ये चोरबागन पूजा समितीचे सचिव राजकुमार सिओडा आणि उपाध्यक्ष शांतनू दुबे यांचा समावेश आहे. याशिवाय मंडपासाठी बांबूची रचना उभारण्याची जबाबदारी असलेले बिप्लब मुखोपाध्याय, गर्दी व्यवस्थापनाशी संबंधित कौशिक साहा आणि पिंटू डे यांनाही अटक करण्यात आली आहे. खासगी सुरक्षा संस्थेचे कर्मचारी सुमन चक्रवर्ती आणि राजेश पाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गिरीश पार्क पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेला नेमकी कोणती कारणे जबाबदार होती आणि गर्दी नियंत्रणात ठेवण्यात कुठे त्रुटी राहिल्या, याचा तपास सुरू आहे.
अमित शहा यांच्याकडून जखमींची विचारपूस
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या दौर्यासाठी शनिवारी कोलकात्यात दाखल झाले होते. मात्र, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर त्यांनी नियोजित कार्यक्रम रद्द केले. रविवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले.
दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी
या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याची घोषणा केली आहे. या तपासात विशेष कार्य दल (एसटीएफ), गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकार्यांचा समावेश असेल. तपासाचे नेतृत्व कलकत्ता उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडे सोपविण्यासाठी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना विनंती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेच्या वेळीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असून, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि मंडपाच्या नियोजनातील संभाव्य त्रुटींचीही चौकशी केली जाणार आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला ’ग्रुप-डी’ श्रेणीतील सरकारी नोकरी दिली जाणार आहे. जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याबरोबरच त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे.
काही भागांत तीन दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश
दुर्घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोलकात्यातील काही भागांत 18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (इछडड) कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. बोवबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निश्चित परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या बेकायदेशीर जमावाला, काठ्या किंवा अन्य घातक शस्त्रे बाळगण्याला आणि शांतता भंग होईल अशा कृतींना मनाई करण्यात आली आहे.
दुर्गापूजा उत्सव अनिश्चित काळासाठी स्थगित
चोरबागन मंडपाचे थीम कलाकार सुशांत शिबानी पाल यांनी या दुर्घटनेला दुर्गापूजा उत्सवासाठी काळा दिवस असे संबोधले. गर्दी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार मंडपात कापडी पडदे लावण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही घडलेल्या दुर्घटनेमुळे उत्सव अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. या घटनेमुळे सार्वजनिक उत्सवांतील गर्दी नियंत्रण, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
