जळगावात भीषण अपघात : कंटेनरच्या धडकेने तिघे चुलतभाऊ ठार


जळगाव (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026) : जळगाव शहरात अपघाताची मालिका कायम असून भरधाव कंटेनर कारवर आदळून झालेल्या अपघातात तिघे चुलतभाऊ जागीच ठार झाले. मृत तिघेही चुलतभाऊ कारने जळगावहून धरणगाव तालुक्यातील झुरखेडा या आपल्या गावाकडे जात असताना हा अपघात घडला. दरम्यान, पाळधी-तरसोद बायपास बंद असल्याने शहरातून येणार्‍या वाहनांची संख्या वाढली असून आतापर्यंत गेल्या अडीच महिन्यात 12 जणांचा हकनाक बळी गेला आहे.

बांभोरी पुलावर अपघात : तिघे चुलतभाऊ ठार
सूत्रानुसार, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे तिघे चुलतभाऊ रविवारी काकांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या आत्याच्या मुलाला सोडण्यासाठी आल्यानंतर परतीच्या प्रवासात घराकडे कारने निघाल्यानंतर बांभोरी पुलावर त्यांच्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पंकज प्रकाश चौधरी (30), रवींद्र अरुण चौधरी (20, दोन्ही रा. झुरखेडा, ता. चरणगाव) व हरीश हिमत चौधरी ( 32, ह.मु.चोपडा) यांचा मृत्यू झाला.






वाहतूक ठप्प
धडकेनंतर कार जागेवरच पूर्णपणे फिरली तर कंटेनर उड्डाणपुलाच्या पुढील बाजूने खाली पडण्यापासून थोडक्यात बचावला. अपघाताची माहिती मिळताच मृत तरुणांच्या नातेवाइकांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली होती. जि.प.चे माजी सदस्य सदस्य प्रताप पाटील यांनी घटनास्थळी व जीएमसी रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. विवाहित हरीष हा सोलरचे काम करीत होता. त्याला दोन लहान भाऊ असून ते झुरखेडा येथे राहतात. हरीषचे वडील चोपडा तालुक्यातील सनपुले येथे दिव्यांग शाळेवर स्वयंपाकी आहेत. दरम्यान, अपघातामुळे शहराकडे खोटेनगरपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !