शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई ; गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसांसह अंबडचा तरुण जाळ्यात

रिल्स पाहून कट्टा बाळगण्याच्या हौसेने पडल्या बेड्या : उमर्टी पुन्हा चर्चेत


शिरपूर (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026) : सोशल मिडीयातील रिल्सला भुलून उच्च शिक्षण घेणार्‍या तरुणाने शस्त्र तस्करीसाठी कुख्यात उमर्टी गाठून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस खरेदी केले मात्र शिरपूर तालुका पोलिसांना माहिती कळताच आरोपी तरुणाला अटक करण्यात आली. चेतन आप्पासाहेब वाघमारे (23, रा.रोहिलागड, ता.अंबड, जि.जालना) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तरुणाकडून एक गावठी कट्टा (पिस्तूल) आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
शनिवार, 17 ऑक्टोबर 2026 रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना हाडाखेड गावाच्या पुढे सुळे फाटा परिसरात एक संशयीत गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती कळताच त्यांनी पथकाला निर्देश दिले. पथकाने संशयीताला ताब्यात घेत त्याची झडती घेतल्यानंतर 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा (पिस्तूल) मॅगझिनसह आणि तीन हजार रुपये किंमतीची तीन जिवंत काडतुसे मिळून 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.






रिल्सला भुलून खरेदी केला कट्टा
आरोपी चेतन हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असून रिल्स पाहिल्यानंतर त्याच्या मनात शस्त्र आपल्याकडे असण्याची इच्छा निर्माण झाली. छत्रपती संभाजीनगरात परीक्षात देवून हा तरुण उमर्टी सीमेवर पोहोचला व त्याने शस्त्र खरेदी केले मात्र पोलिसांनी टीप मिळताच त्यास अटक केली. आरोपीला न्यायालयाने एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस अंमलदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, विजय धिवरे, स्वप्निल बांगर, सुनील मोरे व गुरुदास बडगुजर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !