सदैव हसतमुख, नात्यांमध्ये आपलेपणा जपणार्‍या धुळ्यातील ज्योतीबाई पिंगळकर यांचे अपघाती निधन


साक्री (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026) : प्रतिकूल परिस्थितीतही मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, नातेवाईकांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि चेहर्‍यावर कायम असणारे हास्य अशा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे धुळ्याच्या जिजाऊ नगरातील ज्योतीबाई मच्छिंद्रनाथ पिंगळकर (52) यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. साक्री तालुक्यातील नागाई मातेच्या मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना दुचाकीवरून पडल्याने झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले. अपघाताची ही घटना रविवार, 18 रोजी दुपारी घडली. पिंगळकर यांच्या निधनाने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

ज्योतीबाई पिंगळकर यांच्या निधनाने हळहळ
ज्योतीबाई मच्छिंद्रनाथ पिंगळकर या सदैव हसतमुख राहणार्‍या आणि नातेवाईकांमध्ये आपलेपणा जपणार्‍या व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. कोणत्याही परिस्थितीत नात्यांमधील जिव्हाळा टिकवून ठेवणे, सर्वांशी प्रेमाने वागणे आणि कुटुंबाला आधार देणे, ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना त्यांनी मुलांच्या शिक्षणाला महत्त्व दिले. अडचणींवर मात करत मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कुटुंबीयांसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे नातेवाईक आणि परिचितांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.






दर्शनाहून परतताना अपघाती निधन
साक्री तालुक्यातील नागाई मातेच्या मंदिरात दर्शनासाठी पिंगळकर या मुलगा रवींद्र, जावई विजय सोनार व मुलगा पूजा यांच्यासह रविवारी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास देवीची आरती व दर्शनाहून परतताना पिंगळकर या दुचाकीवरून पडल्याने त्यांना जबर मार बसल्याने त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.मुकेश मोरे यांनी तपासून मृत घोषित केले. साक्री पोलिसात विजय सोनार यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रविवारी रात्री उशिरा त्यांच्यावर धुळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिजाऊ नगरात शोककळा
ज्योतीबाई पिंगळकर यांच्या निधनाने जिजाऊ नगरात शोककळा पसरली असून पिंगळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती मच्छिंद्रनाथ, मुलगा रवींद्र, मुलगी पूजा व जावई विजय सोनार, नात लावण्या असा परिवार आहे. सदैव हसतमुख असणार्‍या आणि सर्वांना आपलेसे करणार्‍या ज्योतीबाई यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व परिचितांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !