विटनेरच्या अल्पवयीन तरुणाचा शॉक लागल्याने मृत्यू
चोपडा (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : चोपडा तालुक्यातील विटनेर येथे राहत्या घरी विजेचा शॉक लागल्याने कृष्णा तुकाराम पाटील (17) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवार, 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्यापूर्वी ही घटना घडली. या घटनेमुळे विटनेर गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
विजेचा जोरदार धक्का
कृष्णा पाटील हा विटनेर येथे आपल्या राहत्या घरी असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. ही बाब लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी आणि गावातील नागरिकांनी त्याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी कृष्णा पाटील याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.पवन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हवालदार हेमंत कोळी करीत आहेत.




