गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह सुरतच्या तरुणाला चोपडा शहर पोलिसांकडून अटक


चोपडा (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : चोपडा शहर पोलिसांनी गुजरातच्या सुरतमधील अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्टा व चार काडतुसांसह बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीविरोधात हाफ मर्डर, दरोडा, पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटीसारखे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या ताब्यातील कार व मोबाईलसह एकूण आठ लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉस्टेबल योगेश गुलाब कोळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोमवार, 19 ऑक्टोबर 2026 रोजी रात्रीच्या सुमारास धनवाड रोडवरील ग्रामसेवक कॉलनी आणि रत्नलोक नगर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयीत कार (जी.जे.05 आर.के.3127) आल्यानंतर तिला थांबवल्यानंतर संशयीत जयेश दिलीप पाटील (24, रा.श्री.जी.नगर सोसायटी, वडवाळा सोसायटीजवळ, कुपदरा सुरत, गुजरात) याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले. आरोपीविरोधात चोपडा शहर पोलिसात योगेश कोळी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.





आठ लाख 30 हजारााचा मुद्देमाल जप्त
आरोपीच्या ताब्यातून सात लाख रुपये किंमतीची कार, एक लाखांचा कट्टा, चार हजार रुपये किंमतीचे चार काडतूस, 26 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल, चार सीमकार्ड असा एकूण आठ लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश पाटील हा गुजरात राज्यातील निष्णात आणि अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर सुरत व इतर भागात 307 (हत्या करण्याचा प्रयत्न), दरोडा, पोक्सो कायदा, अ‍ॅट्रॉसिटी यांसारखे पाच अत्यंत गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !