जळगावात चॉपर हल्ल्यात एकाचा मृत्यू , एक गंभीर जखमी ; एमआयडीसी पोलिसांकडून एका आरोपीला अटक
माऊलीनगर-खेडी बुद्रुक परिसरातील घटना ; मोटारसायकलचा लाईट चमकावल्याच्या रागातून घटना
जळगाव (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : वादात मध्यस्थीसाठी आलेल्या किरण विठ्ठल पाटील (44) व किशोर छगन पाटील (35) यांच्यावर चॉपरने वार केले होते. या हल्लयात किरण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर किशोर पाटील हे गंभीर जखमी झाले होते. एमआयडीसी पोलिसात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. मयूर चैत्राराम जाधव (माऊली नगर, खेडी बु.॥, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मध्यस्थी बेतली जीवावर
विजयादशमीचा सर्वत्र उत्साह असतानाच जळगावजवळील खेडी शिवारातील माऊली नगरात महिलांचा गरबा-दांडिया सुरू होता. यावेळी संशयीत दुचाकीवर आल्यानंतर त्यांनी वाहनाचा लाईट चालू-बंद केल्यानंतर वादाला सुरूवात झाली. किरण विठ्ठल पाटील व किशोर छगन पाटील हे वाद मिटवत असताना आरोपींनी चॉपरने छातीवर वार केल्याने किरण पाटील यांचा मृत्यू ओढवला तर किशोर पाटील हे गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर टोळके वाहनाने पसार झाले. दसर्याच्या रात्री घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.





एका आरोपीला अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर संशयित मयूर चैत्राम जाधव याला अटक करण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेडेड उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, हवालदार रामकृष्ण पाटील, हवालदार गिरीश पाटील, हवालदार प्रमोद लाडवंजारी, हवालदार किरण चौधरी, नाईक प्रदीप चौधरी, कॉन्स्टेबल विशाल कोळी, कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश ठाकरे, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे, मोतीलाल बोरसे आदींच्या पथकाने केली. तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.
