‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव


जळगाव (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. हे औचित्य साधून भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि शासकीय विधि महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन 2026’ विशेष सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते.

तळागाळात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी तसेच वाचन संस्कार घडवण्यासाठी अविरतपणे मोलाचे योगदान देणार्‍या महाराष्ट्रातील दहा वाचनदूतांचा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याहस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट आणि रोख दहा हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. ग्रंथालये समृद्ध करणे, ग्रामीण आणि वंचित घटकांपर्यंत पुस्तके पोहचविणे तसेच नव्या पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे यासाठी या वाचनदूतांनी राबवलेल्या उपक्रमांचे सचिन अहिर यांनी कौतुक करून अभिनंदन केले.






‘ती आणि मी’ हे पुस्तक जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी लिहिले असून मॅजेस्टीक प्रकाशनद्वारा प्रकाशित झाले आहे. हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेत या पुस्तकाचा भावानुवाद झाला असून एक लाखाच्यावर प्रती वाचकांपर्यंत पोहचल्या आहेत. समर्पित सहजीवनाचं प्रेरणादायी आत्मकथनपर चिंतन अशी या पुस्तकाची ओळख आहे. घराघरात ‘ती आणि मी’ हे पुस्तक पोहचविण्यासाठी ‘वाचनगाडा’ गाडीच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविण्यात आले. महाराष्ट्रातल्या दूरवरच्या खेड्यापाड्यातील शाळा-महाविद्यालये तसेच ग्रंथालये आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भाषणं-व्याख्यानं देत ज्ञानेश्वर शेंडे यांनी परिश्रम घेतले. ‘ती आणि मी’ पुस्तकाचे वितरण कार्य सुरू असताना वाचकांचा लेखकाशी झालेला पत्रसंवाद, या पुस्तकावरील भाषण, आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचा वृतांत तसेच परिसंवादातील विचारदर्शन यावर आधारित ‘ती आणि मी : प्रतिसाद’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. प्रस्तुत सन्मानाबद्दल जैन इरिगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ज्ञानेश्वर शेंडे यांचे अभिनंदन केले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !