भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

कांताई जैन साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार शमा भाटेंना ; बालकवी ठोमरे श्रीकांत ढेरंगे, बहिणाई चौधरी डॉ. मीनाक्षी पाटील तर ना. धों महानोर पुरस्कार अच्युत गोडबोले यांना जाहीर


जळगाव (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे व्दिवार्षिक ’कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ सुप्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाई पुरस्कारासाठी डॉ.मीनाक्षी पाटील (मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी श्रीकांत ढेरंगे (संगमनेर, जि. अहिल्यानगर) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी अच्युत गोडबोले (मुंबई) यांना जाहीर झाला आहे.

कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संजीवन दिनाच्या दुसर्‍या दिवशी 13 डिसेंबर 2026 रोजी जळगाव येथे पुरस्कार सोहळा होणार आहे.






साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची मुंबई येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या सौ. ज्योती जैन, रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. सिसिलीया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन व शोभा नाईक (बेळगाव)(दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून) यांची उपस्थिती होती. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक मान्यवरांकडून प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते 2025 या वर्षांसाठीच्या चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. ’भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ’बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.

जैन उद्योग समूहाच्या कल्याणकारी अंग असलेल्या ‘भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर ‘बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे कवयित्री बहिणाई पुरस्कार, ‘भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’तर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बीजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा चौथा पुरस्कार नृत्य क्षेत्रातील ख्यातनाम शमा भाटे यांना जाहीर झाला आहे.

कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना यथोचित गौरव व्हावा यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन उद्योग समूहातर्फे सुरूच असते. भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे कला-साहित्य पुरस्कार जाहीर करताना आनंद होत असल्याचे भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रातिनिधीक जाणकार साहित्यिकांच्या समितीने एकमताने केलेली ही निवड आतापर्यंतच्या कला-साहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांच्या परंपरेत शोभून दिसतात, असे निवड समितीचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !