प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात
इंदापूर : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरजवळ अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे यांच्या पायाला किरकोळ मार लागला आहे पण त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. आनंद शिंदे हे सोलापूर व पुढे सांगोला कडे जाताना मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूरजवळच्या बळपुडी गावाजवळ त्यांच्या तवेरा गाडीला ( एम एच ४६झेड २४४४ ) हा अपघात झाला. त्यांची गाडी एका ढंपरला पाठीमागून जावुन धडकली. अपघातानंतर आनंद शिंदे यांना इंदापूरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने आनंद शिंदे यांना मोठी दुखापत झाली नाही. अपघातानंतर आनंद शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले. गाडीत आनंद शिंदे यांच्यासह चौघेजण होते. कोंबडी पळाली, शिट्टी वाजली, जवा नवीन पोपट हा यासारखी हिट गाणी आनंद शिंदे यांनी दिली आहेत. खणखणीत आवाजाचा गायक म्हणून ते ओळखले जातात. वडील प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आनंद शिंदे चालवत आहेत. मुलगा आदर्श आणि उत्कर्ष शिंदेही शिंदेशाहीची पताका डौलाने फडकवत आहे.