पथराडमधून 25 लाखांचे चोरीचे बाटा शूज जप्त


पाळधी पोलिसांच्या सहकार्याने हरीयाणा क्राईम ब्रांचची कामगिरी

जळगाव : 93 लाख रुपये किंमतीचे बाटा कंपनीचे बुट घेवून निघालेल्या कंटेनर चालकाने रस्त्यातच जळगाव जिल्ह्यातील काही आरोपींच्या संगनमताने महागड्या बुटांची विल्हेवाट लावली. या प्रकरणी फरीदाबाद पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर हरीयाणा क्राईम ब्रांचकडे तपास आल्यानंतर तपासाची सूत्रे वेगात फिरली. आरोपी कंटेनर चालकाच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याने काही माल पाळधी दूरक्षेत्रातील पथराड गावात उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक बुधवारी सायंकाळी पथराडमध्ये धडकले. सुमारे 25 लाख रुपये किंमतीचे बाटा कंपनीचे शूज यावेळी जप्त करण्यात आले.

93 लाखांच्या बुटांची चालकाने लावली विल्हेवाट
तक्रारदार विजयकुमार औमदत्त (फरीदाबाद) यांनी आरोपी व कंटेनर चालक तयुब उर्फ बदलु (रा.शेरगड) यास 93 लाख रुपये किंमतीचे बाटा कंपनीचे बुट फरीदाबादहून चेन्नईत पाठवण्यासाठी कंटेनरमध्ये दिले होते. कंटेनर नियोजित स्थळी न पोहोचल्यानंतर औमदत्त यांनी फरीदाबाद (राज्य हरीयाणा) पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर हरीयाणा क्राईम ब्रांचकडे तपासाची सूत्रे आल्यानंतर कंटेनर चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीने जामनेर येथील आरोपीच्या मदतीने पथराड येथे एका जागी काही माल उतरवल्याची कबुली दिल्यानंतर पथक पाळधी पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड व हवालदार अरुण निकुंभ, विजय चौधरी, महिला कर्मचारी हिवराडे यांना पथकासोबत रवाना केल्यानंतर पथराड येथून सुमारे 25 लाखांचे बुट जप्त करून पथकाने ते ट्रकमध्ये भरून सोबत नेले.

मालेगावातही धडकले पथक
मालेगाव येथेही क्राईम ब्रांचच्या पथकाने काही बुट विक्रेत्यांकडे व्हायरल व्हिडिओच्या आधारे चौकशी केल्याचे सांगण्यात आले मात्र कुणालाही अटक करण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या गुन्ह्यातील कंटेनरदेखील अद्याप बेपत्ता असून त्याचादेखील शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.