‘अंतर्नाद’तर्फे शनिवारपासून एक दुर्वा समर्पणाची उपक्रम


गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणि साहित्याचे वाटप करणार

भुसावळ- भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम शनिवारपासून राबवण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून वंचित, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करायचे, असा हा उपक्रम आहे.
गणेशोत्सवात वारेमाप होणार्‍या खर्चात बचत करण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी केले जाते. गणरायाला दुर्वा म्हणून शैक्षणिक साहित्य अर्पण करून ते गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करायचे, असा हा साधा आणि सोपा उपक्रम आहे. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे.

सहा हजार गरजूंना लाभ
गेल्या दोन वर्षांत 12 शाळांमध्ये किमान सहा हजार गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला. यंदाही ग्रामीण व शहरी भागातील सहा शाळांची निवड करून त्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात पाटी, पेन्सील, वह्या, कंपासपेटी, गणवेश या साहित्याचा समावेश आहे. अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यंदा प्रकल्पप्रमुख म्हणून प्रदीप सोनवणे, प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सामाजिक उपक्रमाचं कोंदण
आम्ही घरच्या घरी शाडूमातीचा गणपती तयार करून त्याची स्थापना करतो. उत्सवाच्या खर्चात बचत करून त्यातून शैक्षणिक साहित्य विकत घेतो. सहकारी व मित्रमंडळीही त्यात स्वयंप्रेरणेने सहभागी होतात. गोळा झालेल्या अर्थसहाय्यातून शैक्षणिक साहित्य विकत घेऊन ते गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद ऊर्जा देणारा आहे, असे अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले.


कॉपी करू नका.