नंदुरबारमध्ये दहा लाखांचा गुटखा जप्त
नंदुरबार : शहरातील रामचंद्र नगर परीसरातून प्रतिबंधीत दहा लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासह वाहन जप्त करण्यात आले. महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला विमल गुटका अवैद्यरीत्या शहरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाल्याने त्यांनी एक पथक त्या ठिकाणी रवाना केले. तेथे एक इको कंपनीची राखाडी रंगाची गाडी (एम.एच.15 एफ.एफ.7243) एका पत्र्याच्या शेडमध्ये उभे दिसून आले शिवाय संशयीत आरोपी ओम गगनदास धनवानी (सिंधी कॉलनी), हा विमल गुटखा विक्री करतांना मिळून आला. काही माल गाडीच्या बाजूला पडलेला दिसून आल्याने गाडीत बसलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील गाडीची व मालाची तपासणी केली असता, त्याकडे महाराष्ट्रात प्रतिबंधीत गुटका मिळून आला. पोलिसांनी 10 लाख पाच हजार 778 रुपयांचा विमल गुटका व एक सुजूकी कंपनीची इको गाडी जप्त करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, राकेश मोरे, दादाभाई मासुळ, अभय राजपूत, आनंदा मराठे, राजेंद्र काटके यांनी केली.





