नवापुरात अवैध सावकार : मोठे घबाड सापडले


जिल्हा उपनिबंधकांच्या रडारवर अनेक अवैध सावकार : लवकरच होणार मोठी कारवाई

नवापूर : नवापूर शहरातील दोन संशयीत सावकाराच्या
घरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील पथकाने झडती घेतली आहे. झडतीमध्ये मोठे घबाड हाती लागल्याची चर्चा आहे. सावकारीच्या तक्रारीवरून नवापूरातील दोन संशयिताची गुरूवारी सकाळपासून ते संध्याकाळी सहापर्यंत कसून चौकशी करण्यात आली.
नवापूर शहरातील वेगवेगळे चार तक्रारदारांनी संशयीत सावकारांविरुध्द कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका तक्रारदाराने 12 लाख, दुसर्‍याने 5 लाख, तिसऱ्याने 2 लाख रूपये व्याजाने घेतले होते. दर महिन्याला दहा टक्केनुसार व्याज दराने रक्कम ते वसुल करीत होते. ती रक्कम वसूल करण्यासाठी विलंब झाल्यास शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती. अशा आशयाची तक्रार जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे प्रभारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार प्रताप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख रणजीत पाटील, सहकार अधिकारी रत्ना मोरे, सहकार अधिकारी प्रकाश खैरनार, सुनंदा सामुद्रे, संगीता कोळी, कुणती पाडवी, हेमंत मरसाळे, शासकीय पंच सखाराम चौधरी, रुस्तम वसावे, किशोर पटेल आदींनी नवापूर येथील संशयितांच्या घरी गुरुवारी सकाळी 6 संध्याकाळपर्यंत घराची झडती केली. संशयितांच्या घरातून एक कट्टा, रोख रक्कम, महत्वाचे दस्तावेज जमा केले आहे. पंचनामा करून संशयिताच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांनी दिली.

अवैध सावकार यांच्या गोटात उडाली खळबळ
घराच्या झडतीमुळे नवापूर शहरात मोठी चर्चा रंगली आहे.
नवापूर शहरात एका आठवड्यात दोन वेळा तीन ठिकाणी घराची झाडाझडीत घेण्यात आल्याने अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. नवापूर शहरातील कोट्यवधीचा सावकारी व्यवहार करणारे संबंधित विभागाच्या हिटलिस्टवर आहेत.
नवापूर शहरातील केवळ चार जणांकडे सावकारीचे परवाने आहेत. त्यापैकी तीन जणांनी परवाने नूतनीकरण केले आहे एकाचे बाकी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. नवापूर शहरासह नंदुरबार जिल्ह्यात शेकडो अवैध सावकार आपला कारभार करत असल्याचे बोलले जात आहे, यावरदेखील संबंधित विभागाने अंकुश लावणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यात अशाप्रकारे कोणी सावकारांनी शेतकरी किंवा नागरीकांना कर्ज दिले असेल व कर्जाचा रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी करत असेल तर अशा सावकारांविरुद्ध नंदुरबार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांनी केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !