जळगावात जामीन नाकारताच आरोपीचा पलायनाचा प्रयत्न
पोलिसांच्या सतर्कतेने आरोपी पुन्हा जाळ्यात : होमगार्डवर गुलाल फेकण्याच्या गुन्ह्यात झाली होती अटक
जळगाव- सार्वजनिक मंडळाचा गणपती घेवून जात असताना वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये म्हणून बंदोबस्तातील होमगार्डने तरुणांनी पुढे जावून काही अंतरावरुन मिरवणुक काढण्याची सुचना केली मात्र तरीही न ऐकता तरुणांनी उलट मुजोरी करुन विरोध करणार्या मनोज कोळी या होमगार्डच्या अंगावर गुलाल फेकल्याची घटना 2 रोजी सायंकाळी अजिंठा चौकात घडली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात संशयित राहुल गुलाबराव पाटील (रा.लक्ष्मीनगर) याने बुधवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. जामीन अर्ज नामंजूर करताच राहुलने न्यायालयात आवारातील भिंतीवरुन उडी मारून पसार होण्याचा प्रयत्न केला मात्र एमआयडीसी पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.
अशी घडली होती घटना
अजिंठा चौफुलीवर मुर्ती घेवून जात असताना वाहतूक सुरळीत करण्यासह बंदोबस्तासाठी कर्मचार्यासह होमगार्ड मनोज कोळी कर्तव्यावर होते. 2 रोजी दुपारी ऑटो आयकॉनचे कर्मचारी ढोलताशांसह गुलालाची उधळण करत मिरवणुक घेत जात होते. होमगार्ड कोळी यांनी वाहतुकीची कोंडी होत असून काही अंतरावरुन मिरवणूक काढा तसेच गुलाल फेकू नका, असे सांगितले. यानंतर मंडळातील उमेश जयवंतराव पाटील (रा.तरसोद) याने काही एक न ऐकता मुद्दामहून होमगार्ड कोळी यांचे अंगावर गुलाल फेकला. गुलाल का फेकला ? याचा जाब विचारल्यावर उमेशसह सोबतचा राहूल गुलाबराव पाटील हाही होमगार्ड कोळी यांच्यावर धावून आला. याप्रकरणी मनोज कोळी यांच्या फिर्यादीवरुन रामानंद पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी उमेश यास ताब्यात घेतले होते. राहूल हा पसार होता.
पोलिसांनी पाठलाग करुन शाहु नगरात पकडले
गुन्ह्यात राहूल पाटील याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला. या अर्जावर प्रमुख व सत्र जिल्हा न्या.गोविंद सानप यांच्या न्यायालयात काम चालले. गुन्ह्याचे गांभीर्य तसेच वर्दी घातलेल्या व्यक्तीवर जाणून बुजून गुलाल उडविणे व शिवीगाळ करणे या कारणांवरुन न्या. सानप यांनी अटकपूर्व जामीन फेटाळला. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. अटकपूर्व नामंजूर होताच, बहिणी तसेच वकीलाच्या आडोशाने राहूलने न्यायालयातून पलायनाचा प्रयत्न केला, ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, विनोद बोरसे, भुषण सोनार यां कर्मचार्यांनी पाठलाग करुन शाहूनगरातून त्याला गुन्ह्यात अटक केली. याबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.