यावलमध्ये आज पेहरन-ए-शरीफ उत्सव रंगणार


यावल- शहरात येत्या शनिवारी सायंकाळी ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाला सुमारे 100 वर्षांची परंपरा आहे. उर्दू वर्षानुसार मोहरमच्या 14 तारखेला हा उत्सव साजरा करतात. त्यात सय्यदना गौसेआजम दस्तगीर यांचे पेहरन म्हणजेच तब्बरूकचे (पवित्र वस्त्र) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक हजेरी लावतात. यंदाच्या उत्सवाचे आयोजन बाबूजी पुरा उत्सव समितीने केले आहे.

पवित्र वस्त्राची आज निघणार मिरवणूक
शहरातील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र)असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे या पवित्र वस्त्राची सजवलेल्या डोलीतून वाद्याच्या गजरात धार्मिक गीत (नाते पाक) गात मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या उत्सवात हिंदू-मुस्लिम बांधवही सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणुकीत नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची धारणा आहे. जिल्ह्यासह मंबई, मालेगाव, बर्‍हाणपूर, सूरत, खंडवा येथील भाविक येतात. उत्सव समिती अध्यक्ष मोहंमद हकीम मोहंमद याकूब, तर कुस्ती दंगल समितीचे अध्यक्ष शकील खान जमशेर खान, खजिनदार अयुब खान फजलुर्रहमान खान, सचिव युनूस खान युसूफ खान व सहसचिव सईद खान फरिद खान आहेत. दरम्यान, उद्या रविवारी दुपारी तीन वाजता हडकाई नदीपात्रात कुस्त्यांची दंगल होणार आहे.


कॉपी करू नका.