मंत्री महाजनांच्या प्रयत्नांनी मंजूर विकासकामांचे आमदारांनी केले भूमिपूजन
वरणगावात साडेतीन कोटींच्या विकासकामांना प्रारंभ : धडपड्या लोकप्रतिनिधींमुळे शहराचा विकास -संजय सावकारे
वरणगाव- अल्पावधीत अधिकाधिक निधी मिळवून विकासाची घोडदौड करणार्या वरणगाव नगरपालिकेचे कार्य कौतुकास्पद असून दर मंगळवारी नगराध्यक्ष सुनील काळे मंत्रालयात नगरपालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी धडपड करीत असतात व असे लोकप्रतिनिधी असले की विकास हा शहराचा होत असतो. इथले नगरसेवक आप पसातील मतभेद विसरून शहर विकासासाठी एकत्र येतात हे चांगले चित्र आहे, असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी वरणगाव येथे मंजूर झालेल्या व्यापारी संकुल, सामाजिक सभागृह आदी साडेतीन कोटींच्या कामांचा भूमिपूजन शुक्रवारी आमदार सावकारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी शाम गोसावी, प्रा.जतीन मेढे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, प्रतिभा चौधरी, राजेंद्र चौधरी, रवी सोनवणे, गणेश धनगर, गणेश चौधरी, भाजपा शहर प्रमुख सुनील माळी, अल्लउद्दीन सेठ, नारायणराव जैस्वाल, मनोहर सराफ, कामगार नेते मिलिंद मेढे, साजीद कुरेशी, ईरफानभाई पिंजारी, सुरेश चौधरी, शामराव धनगर, ज्ञानेश्वर घाटोळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते
जलसंपदा मंत्र्यांमुळे वरणगावचा विकास -सुनील काळे
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, वरणगाव शहरात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यामुळेच 45 कोटी खर्चातून विकासकामे होत असून आगामी काळातही शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. नगरपरीषदेच्या इमारतीचे हल्लीच्या जागेवरच नूतनीकरण करण्यात येणार असून वरणगाव शहरात विकासाची घौडदौड अशीच कायम राहणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक मुख्याधिकारी शाम गोसावी तर सूत्रसंचालन संजीव माळी यांनी केले . यावेळी 380 अपंग दिव्यांग बांधवाना आमदार सावकारे यांच्याहस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.