नाशिकमधील दरोड्याप्रकरणी दोघे पसार आरोपी चार वर्षांनी जाळ्यात
नाशिक : शहरातील एका वाइन शॉपचालकावर हल्ला करून सुमारे 17 लाख 76 हजार रुपयांची जबरी लूट करून दहा संशयित दरोडेखोर पसार झाले होते. या गुन्ह्यात सात संशयितांना अटक करून गुन्हे शाखा- 1 च्या पथकाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले मात्र गुन्ह्यातील तिघे पसार होते, त्यापैकी दोघांना तब्बल चार वर्षानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने वडाळागाव, आडगावमधून सुमारे चार वर्षांनंतर अटक केली. खंडू लक्ष्मण शिरसाठ (41) यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांच्याकडील सुमारे 17 लाख 76 हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आली. या गुन्ह्यात दरोडेखोरांची टोळी पोलिसांनी निष्पन्न करून दोन महिन्यांनंतर गुन्ह्याची उकल करून सात संशयीत दरोडेखोरांना अटक केली होती.
चार वर्षानंतर आरोपी जाळ्यात
या गुन्ह्यात तीन दरोडेखोर तेव्हापासून आजतागायत पसार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते, मात्र ते हुलकावणी देण्यास यशस्वी ठरत होते. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वडाळागावात एका पेट्रोलपंपाजवळ पथकाने सापळा रचला.
यावेळी संशयित अमजद सय्यद हा इसम पेट्रोलपंपाजवळ आला असता साध्या वेशातील पोलिसांनी त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला मात्र सहा. निरीक्षक पुष्पा निमसे, हवालदार कोकाटे, स्वप्नील जुंद्रे, नीलेश भोईर यांनी पाठलाग करून शिताफीने सय्यद याच्या मुसक्या आवळल्या. त्यास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा दुसरा फरार साथीदार रफिक शेख ऊर्फ सोनू याविषयी माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकाने आडगाव वैद्यकीय महाविद्यालयाच्या चौफुली परीसरात सापळा रचला. यावेळी संशयित सोनू हा त्या ठिकाणी आला असता पथकाने त्याला अटक केली.