एकनाथराव खडसेंना पाहताच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काय एकनाथ महाराज !


नाशिक : महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त नाशिकमध्ये आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलतात? याकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते. त्यातच गुरुवारी दुपारी त्यांचे सभा स्थळावर आगमन झाल्यानंतर सार्‍यांनीच त्यांना नमस्कार घालून अभिवादन केले. पंतप्रधान मोदी व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी सर्वांशीच स्मितहास्य केले तर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे व्यासपीठाच्या मागे असल्याने तेदेखील पुढे आल्यानंतर मोदी यांनी त्यांच्याशी मराठीतच संवाद साधून ‘काय चाललंय एकनाथ महाराज’ अशी विचारणा केली. यावेळी खडसे यांनी ठिक चाललयं, असे सांगून त्यांच्याशी हस्तांदोलन केले.

भाषणाची संधी हुकली मात्र ‘वलय’ आजही कायम
खडसेंपेक्षा ज्युनियर असलेल्या नेत्यांना महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात भाषणाची संधी मिळाली मात्र खडसेंना संधी न मिळाल्याचे दुःख त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना झाले. असे असलेतरी पंतप्रधान मोदी यांनीच त्यांची थेट ख्यालीखुशाली विचारल्याने राज्याच्या पटलावर खडसे यांचे आजही महत्व तेव्हढेच अबाधीत असल्याचे यातून स्पष्ट झाले. खडसे यांनीदेखील मोंदीनी मराठीतून संवाद साधल्याच्या वृत्ताला ‘ब्रेकींग महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीशी बोलताना होकार दिला.

पंतप्रधानांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पंचवटीतील तपोवनातील सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याचे आगमन झाले. सव्वा दोनच्या सुमारास पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ‘प्रभू श्री राम आणि सीता मातेच्या चरणस्पर्शाने पावन आणि आदिमाया आदिशक्ती महिषासुर मर्दिनी सप्तश्रृंगी मातेच्या निवासाने पवित्र अशा नाशिकाच्या या पावन धर्मभूमीला माझा शत: शत: नमस्कार,’ अशी मराठमोळी सुरुवात मोदींनी आपल्या भाषणाला केली.

फडणवीस हे ऊर्जावान मुख्यमंत्री
भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी फडणवीस यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना फडणवीस हे ऊर्जावान मुख्यमंत्री असल्याचे मत व्यक्त केले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवलं आहे. हा माझा सन्मान आहे,’ अशी भावना मोदींनी व्यक्त केली. ‘मी देवेंद्र फडणवीस यांना नमन करण्यासाठी आलो आहे. चार हजार किलोमीटरच्या यात्रेत कोट्यवधी लोकांनी आशीर्वाद दिला आहे. देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा स्थिर राजकारणाची संधी आहे. महाराष्ट्र आणि गुजरात कधी काळी एकाच ताटात जेवायचे. गुजरातमध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मला दिली. जो फायदा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे तो कधीकाळी मला मिळाला होता,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.

फडणवीस यांची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टिका
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण केले मात्र अनेक मुद्दे त्यांनी हिंदीमध्ये मांडले. फडणवीस यांनी आपल्या भाषणामधून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका केली तसेच त्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात काय काय कामे केली आहेत याची थोडक्यात माहिती दिली. फडणवीस यांच्या अंदाजे दहा मिनिटांच्या भाषणामधील बराचसा भाग हा हिंदीत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी फडणवीस यांनी बरेच मुद्दे हिंदीमधून मांडल्याचे चित्र दिसून आले.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !