शिक्षण क्षेत्रामध्ये आर.एल.माळी यांचे मोलाचे योगदान
आ.डॉ.सुधीर तांबे : जिल्हा परीषद जळगावचे शिक्षण उपनिरीक्षक आर.एल.माळी यांचा अनोखा सेवापूर्ती समारंभ
रावेर : कोरोनासारखी पार्श्वभूमी असूनही कुठेही एकत्रीत न जमता आपापल्या घरून ऑनलाइन गुगल मीटिंग आयोजित करून जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेने जिल्हा परीषद जळगावचे शिक्षण उपनिरीक्षक आर.एल.माळी (जुनियर कॉलेज विभाग) यांचा अनोखा सेवापूर्ती समारंभ आयोजित केला. अध्यक्षस्थानी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विधान परीषद सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे होते. त्यावेळेस त्यांनी आर.एल.माळी यांच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेच्या कार्याचा गौरव केला. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे.के.पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे प्रतिनिधी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड, जुक्टो संघटना ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड व प्रा.विकास सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविक माजी जिल्हाध्यक्ष प्रा.डी.डी.पाटील यांनी केले. संघटनेचे सचिव प्रा.शैलेश राणे यांनीदेखील माळी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
समन्वय ठेवल्याने यशस्वी : आर.एल.माळी
प्रा.सुनील गरुड यांनी यथोचित मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुनील सोनार, उपाध्यक्ष प्रा.राजेश बडगुजर यांनीदेखील माळी यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. सत्कारमूर्ती आर.एल.माळी यांनी सत्काराला उत्तर देताना जळगाव जिल्ह्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय संघटनेशी समन्वय ठेवून मी सातत्याने काम केल्यामुळेच यशस्वी होऊ शकलो. दैनंदिन प्रशासनात संघटनेच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केले, अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली. जळगाव जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी देखील सदिच्छा दिल्या. ऑनलाईन सूत्रसंचालन संघटनेचे सचिव प्रा.शैलेश राणे यांनी केले. उपाध्यक्ष प्रा.संजय चौधरी यांनी सहकार्य केले. जिल्हा कार्यकारीणीचे सर्व सदस्य व आर.एल.माळी यांचे आप्तेष्ट या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाचे आभार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार यांनी मानले.




