पत्रकारीता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून घडवता येईल उत्तम करीयर


प्रा.विनायक वाडेकर : संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात व्याख्यान

मुक्ताईनगर : आजकाल उपलब्ध नोकर्‍या आणि त्या तुलनेत पदवी पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थ्यांचे प्रमाण पाहता, नोकरीच्या संधी कमी होत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम, व्होकेशनल कोर्स व स्वयंरोजगाराकडे वळणे महत्वाचे ठरत आहे. पत्रकारीता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उत्तम असे करियर घडवता येऊ शकते, असे प्रतिपादन मुक्ताईनगर येथील पत्रकार प्रा.विनायक वाडेकर यांनी केले. मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या वतीने ‘पत्रकारीता : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करीरयर निवडीचा व स्वयंरोजगाराचा उत्तम मार्ग’ या विषयावर व्याख्यानप्रसंगी प्रा.वाडेकर बोलत होते.

कोर्सच्या औचित्याने व्याख्यान
संत मुक्ताबाई महाविद्यालयात येत्या 2021-22 या शैक्षणीक वर्षापासून बी. व्होक. (जर्नालिजम अ‍ॅण्ड. मास कम्युनिकेशन) हा व्होकेशनल अभ्यासक्रम एक वर्षासाठी सर्टिफिकेट कोर्स, दोन वर्षासाठी डिप्लोमा कोर्स आणि तीन वर्षांसाठी पदवी स्तरावर सुरू करण्यात येत आहे. कोणत्याही शाखेचा किमान 12 वी पात्रता धारण करणारा विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.



पत्रकारीता अभ्यासक्रमानंतर विविध ठिकाणी नोकरीच्या संध्या
पत्रकारीता म्हणजे काय? पत्रकारांची कर्तव्ये कोणती? या सोबतच पत्रकारीता अभ्यासक्रम करीयर घडविण्यात कशी महत्वाची भूमिका निभावतो, याची अभ्यासपूर्ण माहिती प्रा.विनायक वाडेकर यांनी दिली. प्रा.वाडेकर म्हणाले की, पत्रकारीता अभ्यासक्रम पूर्ण केल्यास कोणत्याही नामवंत वृत्तपत्रात, दूरदर्शन किंवा न्यूज चॅनेलवर पत्रकार, संपादक म्हणून, रेडिओ जॉकी, खाजगी कंपनीमध्ये पीआरओ व सरकारी नोकरीत माहिती अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. पत्रकारीतेचे कार्य पूर्णवेळ व्यवसाय म्हणूनही करता येऊ शकते किंवा नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून पार्टटाईम सुद्धा करता येऊ शकते. या माध्यमातून सन्मानजनक मानधन मिळत असून सोबत सामाजिक प्रश्नांची जाण होते. समाजाचे प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणून देता येतात. विद्यार्थ्यांना अश्या प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे बेकारी सारख्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.

विद्यार्थी हितासाठी अभ्यासक्रम : प्राचार्य
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील होते. ते म्हणाले की, संस्थाध्यक्ष रावसाहेब शेखावत यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी किंवा त्यांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सदर अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालयाने हा पदवी अभ्यासक्रम सुरू आहे.प्रास्ताविक आयक्यूएसीचे समन्वयक प्रा.एल.बी.गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी गायत्री चिम तर आभार आयोजक प्रा.डॉ.संदीप माळी यांनी मानले. कार्यक्रमास तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !