कोरोनाने मृत पावलेल्या कर्मचार्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर तत्काळ सेवानियुक्त करा
आमदार डॉ.सुधीर तांबे : शासकीय-निमशासकीय तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील कर्मचार्यांचा कोरोनाने मृत्यू ; संघटनेच्या समस्या सोडवण्याची ग्वाही
भुसावळ : कोरोनाच्या कठीण शासकीय-निमशासकीय तसेच खाजगी शिक्षण संस्थात कार्यरत अनेक कर्मचार्यांचा मृत्यू ओढवल्याने रीक्त जागी मृत पावलेल्या कर्मचार्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर तत्काळ सेवानियुक्त करावे, अशी मागणी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केली आहे.
पदाधिकार्यांची विविध मागण्यांवर चर्चा
जळगाव अजिंठा विश्रामगृहावर जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, सचिव प्रा.शैलेश राणे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संदर्भातल्या काही समस्यांवर चर्चा केली. त्यात विनाअनुदानित कनिष्ठ कर्मचार्यांच्या शालार्थ प्रणालीसंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी, त्याचबरोबर विनाअनुदान तत्त्वावर असणार्या शिक्षकांना सेवा सातत्य प्रमाणपत्र देण्यासाठी कॅम्पचे नियोजन करण्यात यावे, पायाभूत तसेच वाढीव पदासंदर्भात लवकर शासन मान्यता मिळवून द्यावी, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे मृत पावलेल्या शिक्षक-शिक्षकेतर यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, कोरोना कालावधीत कोरोनाग्रस्त शिक्षकांच्या वैद्यकीय बिलास शासनााने तत्काळ मंजुरी मिळवून द्यावी अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी डी.जे.पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे उपस्थित होते. या सर्व प्रश्नांसंदर्भात आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.




