भुसावळातील वीज ग्राहकाला चक्क तीन लाखांचे बिल
वीज महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार शहरात पुन्हा उघड : व्यवस्थापकीय संचालकांकडे लेखी तक्रार
भुसावळ : शहरातील वीज ग्राहकांच्या वीज बिलांबाबत ग्राहकांच्या सातत्याने तक्रारी वाढत आहेत. दर महिन्याला ग्राहकांना मिळणार्या वीज बिलात सातत्याने चुका होत असून स्थानिक पातळीवर वारंवार होणार्या चुका महावितरणच्या प्रमुख अधिकार्यांचे ग्राहकांसोबत होणारे गैरवर्तन मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप आहे. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर व स्थानिक पातळीवरील अधिकारी रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरबाबत वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे श्रीनगरातील रमेश सपकाळे यांना सप्टेंबर महिन्याचे दोन लाख 97 हजारांचे वीज बिल पाठवून मोठा धक्का देण्यात आला तर भोई नगरासारख्या गरीब वस्तीतील गिरधर भोई यांना 47 हजार 150 रुपयांचे बिल देवून ग्राहकांची एका प्रकारे वीज कंपनीने थट्टाच केली आहे.
व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार
जळगाव रोड परीसरातील भोई नगर, श्री नगर, हुडको कॉलनी, गणेश कॉलनी, विद्या नगर, खळवाडी, काशीराम नगर, रेल दुनिया, अयोध्या नगर भागातील ग्राहकांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराची तक्रार प्रा.सीमा धीरज पाटील यांच्याकडे केल्यानंतर बुधवारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना प्रा.सीमा धीरज पाटील यांनी गाहकांच्या वतीने लेखी तक्रार सादर केली.
तक्रार करणार्यांना अधिक त्रास
वेडी माता मंदिराजवळील सुरेश पाटील हे गेल्या तीन महिन्यापासून सतत चुकीच्या देयकाची तक्रार करीत आहेत. दुरुस्ती झाल्यानंतर परत दुसर्या महिन्यात तीच चूक होत आहे शिवाय अधिकार्यांची भेट घेण्यासाठी एका दिवसाची सुटी घ्यावी लागते, असे ग्राहकाने बोलून दाखवले. सुमन कोलते यांना मागील सहा महिन्यांत सरासरी देयके व नंतर नादुरुस्त मीटरचे देयक मिळाले त्यांनी सुद्धा सलग तक्रारी केल्या म्हणून या महिन्यात त्यांना सात हजारांचे देयक पाठव्यात आले.
महावितरणला पाच कोटींचा फायदा
नियमानुसार देयकांचा तारखेनंतर पाच दिवसाच्या आत ग्राहकांना वीज देयके मिळाली पाहिजे परंतु 18 तारखेला तयार झालेले देयक 25 तारखेला ग्राहकांना मिळाली. 27 तारखेपर्यंत देयक भरणा सूट मिळेल. उशीरा मिळालेल्या देयकामुळे महावितरणला या महिन्यात पाच कोटी रुपयांचे उत्पन्न होईल व ग्राहकांचे नुकसान झाले आहे. या सर्व तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात अन्यथा ग्राहकांचा रोषाला सामोरे जाण्यास तयार राहवे, असा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे.