भंवरखेड्यात झाडावर वीज पडल्याने पाच जण ठार
धरणगाव : तालुक्यातील भंवरखेडे गावाजवळील विवरे शिवारात मुसळधार पावसामुळे झाडाखाली आश्रयासाठी बसलेल्या एकाच कुटुंबातील चौघांसह अन्य एका शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये पती-पत्नीसह दाम्पत्याच्या दोघा सुना व एका रोजंदार महिलेचा समावेश आहे.
झाडाचा आश्रय त्यांच्यासाठी ठरला काळ
भंवरखेडे गावाजवळील विवरे शिवारातील गट क्रमांक 39 मध्ये पाचही जण ज्वारी काढणीसाठी गेले असता गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली तर त्याचवेळी भंवरखेडे गावाजवळील हिवरे शिवारात शेतात काम करीत असलेले रघुनाथ दशरथ पाटील (67), त्यांच्या पत्नी अलकाबाई रघुनाथ पाटील (60), स्नुषा लताबाई उदय पाटील (35), दुसर्या स्नुषा शोभाबाई भागवत पाटील (40) व गावातील रोजंदारीवरील महिला कल्पनाबाई शामकांत पाटील (35) हे पावसापासून बचावासाठी शेतातील झोपडीजवळील लिंबाच्या झाडाच्या आश्रयाला आले मात्र त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. या घटनेत सुदैवाने एक जण बचावला असून तो झाडाजवळ न थांबला नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मृतदेह जिल्हा रुग्णालयात
घटनेची माहिती कळताच धरणगावचे सहाय्यक निरीक्षक पवन देसले व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. सर्कल, कोतवाल, तलाठी तसेच पोलिस पाटलानेही घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला माहिती कळवली. दरम्यान, पाचही जणांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.