नेत्यांवर कारवाई झाली तर ईडीचा काय दोष : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे
जळगाव जामोद : नेत्यांवर ईडीची कारवाई झाली तर त्यामध्ये सध्याचा सरकारचा काय दोष? असा सवाल करीत भाजपा सरकार हे सूडबुद्धीने ईडीची कारवाई करीत आहे, असा कांगावा साफ खोटा आहे, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांवर शरसंधान साधले. काँग्रेसचे सरकार असताना शरद पवार, अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेच्या निधीचा गैरवापर केला. नियमबाह्य कर्ज उचलले. साखर कारखाने तोट्यात आणले. ते विक्रीसाठी काढले आणि तेच कारखाने याच बँकेचे पुन्हा कर्ज घेवून विकत घेतले. हा गैरव्यवहार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना समोर आला, असेही ते म्हणाले. गुरुवारी जळगाव जामोद येथे भाजपाच्या पेज प्रमुख मेळाव्यात बोलत होते. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तुरुंगात भेटण्यासाठी सोनिया गांधी व मनमोहन सिंग गेले होते. कारण आमची नावे सांगू नका नाहीतर आमच्यावरही ईडीची कारवाई होईल, अशी भीती या नेत्यांना आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ बारामती व पुणे बंद ठेवण्यात आले आहे. तेथे जावू नका, काळे झेंडे दाखवण्यात येतील, असे सांगण्यात आले. तरी मी तेथे गेलो. ही कामे आम्ही आधी केलीत, यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीला कायम करायची आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.