वाहन चालकाला मारहाण करीत 20 लाखांचा मुद्देमाल लुटला
नंदुरबार : आयशर चालकासह दोघांना मारहाण करीत दरोडेखोरांनी 20 लाखांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना नंदुरबार वाका चार रस्त्यावर घडली. गुजरातमधून व्यापार करण्यासाठी कपडे घेऊन येणार्या वाहन चालकासह मालकाला मारहाण करीत लुटमार करण्यात आली असून कपड्यांच्या 128 गठाणींसह सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
आयशर लांबवत केली लूट
जळगाव जिल्ह्यातील म्हसवे येथील रहिवासी किशोर संतोष पाटील हे आयशर घेऊन अहमदाबाद येथून कापड्यांचे गठाणी भरुन अमरावतीकडे निघाले होते. शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्यासमोर एक अज्ञात ट्रक येऊन उभा राहिला. ट्रकमधील एकाने आयशर चालक संजय मच्छिंद्र पाटील यांचे हातावर व खांद्यावर मारहाण केली. गाडी मालक किशोर संतोष पाटील यांचेही हातपाय बांधून त्यांना मारहाण करण्यात आली. चार दरोडेखोरांपैकी एकाने आययर गाडी अज्ञात ठिकाणी नेत जबरी लूट केली. यामध्ये जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला. लूट करणारे चौघेही मुद्देमाल घेऊन पसार झाले. संजय पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस दरोडेखोरांचा तपास गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात करत आहे.





