जि.प.शाळांमधील साहित्य चोरीचा उलगडा : तिघे अटकेत, पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
एकाचवेळी 18 गुन्हे उघडकीस : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
नंदुरबार : शहादा तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये चोरी झालेल्या तसेच इतर दोन अशा एकूण 18 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला आहे. ाप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नूतन अधीक्षकांच्या आदेशानंतर कारवाई
जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची सुत्रे हातात घेतल्यानंतर ना उघड मालमत्तेच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात जिल्हा परीषद शाळांचे कुलूप तोडून इनव्हर्टर, बॅटरी व एलइडी टीव्ही चोरीचे गुन्हे दाखल होते मात्र ते उघडकीस येत नसल्याने या संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आले होते. स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमधील चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करुन चोरी होणारे ठिकाण , वेळ, दिवस यांची इत्यंभूत माहिती घेवून पथकाला सुचना दिल्या. गुरुवार, 23 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे कळमकर यांना चिरडे, ता.शहादा गावात एक इसम कमी किंमतीत व विना बिल पावती इन्व्हर्टर व बॅटरी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कळमकर यांनी तत्काळ एक पथक तयार करुन चिरडे येथे पाठविले. तेथे सापळा रचून संशयीत इसमास इनव्हर्टर व बॅटरीसह ताब्यात घेतले. सोमनाथ ऊर्फ सोमा काशिनाथ दशरथ (रा.सुलवाडे ता.शहादा) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने अजय आंबालाल मोरे (21, रा.सुलवाडे, ता.शहादा), अजय ऊर्फ टाईगर राजु पावरा (22, रा. ब्राम्हणपुरी ता.शहादा) यांचे व सुलवाडे, ब्राम्हणपुरी या गावातील तसेच इतर साथीदारांच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले.





मुद्देमाल आरोपींकडून जप्त
आरोपींकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विविध कंपनीचे एकूण 9 ल्युमिनस, एक्साईड , मायक्रोटेक कंपनीचे इनव्हर्टर, 9 एक्साईड बॅटरी, 2 टीसीएल कंपनीचे एलईडी टीव्ही, 02 इन्टेक्स कंपनीचे होम थिएटर , 1 एलसीडी मॉनिटर, 1 फॉर्म्युनर कंपणीचा स्टँड फॅन व गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूणण 3 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय सारंगखेडा व म्हसावद येथील प्रत्येकी 1 अशा 18 घरफोडीचे गुन्हे उघडकिस आले आहेत. जिल्ह्यातील इतर ठिकाणी झालेल्या घरफोडीचे गुन्हे देखील उघडकीस येतील पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस नाईक गोपाल चौधरी, जितेंद्र अहिरराव, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, सतिष घुले यांच्या पथकाने केली.
