भुसावळात सामाजिक तेढ निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल : चौघांना अटक
समाजात तेढ निर्माण करणार्यांची यापुढे खैर नाही : पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे
भुसावळ : भुसावळातील तरुणाचा पूर्व वैमनस्यातून नशिराबाद येथे खून झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेच्या अनुषंगाने दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडिओ तयार करून तो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौघा आरोपींना गुन्हा दाखल करून अटक केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरात यापुढे सोशल मिडीयावर पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार असून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे.
भुसावळातील चौघा तरुणांना अटक
सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी संशयीत आरोपी शाहरूख खान इक्बाल खान (24), आवेश शेख बिस्मिल्ला (19, दोन्ही रा.जाम मोहल्ला) व शेख अब्दुल शेख रहेमान उर्फ पिंटू मामा (35, बिस्ती गल्ली, जाम मोहल्ला, भुसावळ) व शाहबाज खान इक्बाल खान (21, ग्रीन पार्क, बिस्मिल्ला चौक, खडका रोड, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन दगडू सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार भादंवि 505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


सामाजिक शांतता बिघडणार्यांची खैर नाही
धम्मप्रिय मनोहर सुरळकर (19, पंचशील नगर, भुसावळ) या तरुणाची 21 रोजी जामिनावर सुटका झाल्यानंतर नशिराबाद उड्डाणपुलाखाली संशयीत आरोपी शेख समीर शेख जाकीर (21, पंचशील नगर, भुसावळ) व शेख रेहान शेख नईम (22, पंचशील नगर, भुसावळ) यांनी गोळीबार व चाकूचे वार करून हत्या केली होती. शेख समीरचा लहान भाऊ मो.कैफ याचा गतवर्षी 18 ऑक्टोबर 2020 रोजी संशयीत धम्मप्रियसह अन्य पाच आरोपींनी खून केल्याने आरोपींनी बदल्याच्या भावनेतून हे कृत्य केले होते. दरम्यान, या घटनेनंतर या परीसरात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावून शांतता निर्माण केल्यानंतर दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पद्धत्तीने चारही तरुणांनी व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केल्याने पोलीस प्रशासनाने त्याची लागलीच दखल घेत चौघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली तसेच त्यांचे मोबाईलही जप्त करून व्हिडिओ डिलीट केले आहेत. सामाजिक शांतता बिघडवणार्यांची यापुढे खैर नाही, असा संदेशही पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.
सोशल मिडीयाचा दुरुपयोग केल्यास खैर नाही : पोलीस उपअधीक्षक
आगामी सण-उत्सव व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणतीही आपत्तीजनक पोस्ट, व्हिडिओ वा मजकूर शेअर केल्यास तसेच जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
ही बातमी वाचली का- मोठी बातमी : राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोबरपासून खुली होणार


