सुरवाडे कपार्टमेंटमध्ये वृक्षतोड करीत अतिक्रमण करणार्या चौघांवर वनविभागाची कारवाई

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर वनविभागाच्या क्षेत्रात असलेल्या सुरवाडा कंपार्टमेंटमध्ये अवैधरीत्या वृक्षतोड करून अतिक्रमण केले जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर सापळा रचून चौघांवर कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली तर त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने चारही संशयीतांची पोलीस कोठडीत रवानगी केली. मुक्ताईनगर वनक्षेत्रातील सुरवाडा शिवारातील कंपार्टमेंट क्रमांक 502 मध्ये काही जण अवैधरीत्या वृक्षतोड करून शेत जमिनीसाठी अतिक्रमण करीत असल्याची माहिती मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव, वनपाल ललित गवळी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला सोबत वनविभागात सापळा रचून कमलसिंग गारद्या बारेला, हरसिंग वेल्या बारेला, शीतला रमेश बारेला व वेल्या जामद्या बारेला यांना ताब्यात घेतले.
धारदार शस्त्रेही आढळली
यावेळी त्यांच्या झोपडीची झडती घेतली असता यामध्ये दोन तलवारी, तिरकामठे, भाले व कोयते अशी धारदार शस्त्रे आढळून आल्याने त्यांना अटक करून जिल्हा सत्र न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई वनविभागाचे उपवनसंरक्षक दि.वा.पगार, सहाय्यक वनसंरक्षक चि.रा.कामडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र अधिकारी व जामनेर विभागाचे वनकर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने केली. या भागात आंतरराज्यीय टोळी असल्याचा संशय वनविभागाला आहे.