नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याची परवानगी द्यावी
करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत यांची भुसावळात मागणी
भुसावळ : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटांमुळे सण-उत्सव साजरा करण्यास अनंत मर्यादा आल्या आता मात्र जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असून आगामी दुर्गोत्सव सणात नऊ दिवस दांडीया रास खेळण्यासह स्टॅण्डींग दोन लाऊड स्पीकर लावू देण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत यांनी गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परीषदेत केली.
जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार
निखील राजपूत म्हणाले की, दोन वर्षांपासून सण-उत्सव शासनाने लादून दिलेल्या नियमांना अधीन राहून साजरे करण्यात आले आता मात्र कोरोना नियंत्रणात आल्याने दुर्गोत्सव सण उत्साहात साजरा करता येण्यासाठी प्रशासनाने मागणीची सकारात्मक दखल घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना प्रत्यक्ष भेटून या मागणी संदर्भात करणी सेनेतर्फे निवेदन देण्यात येईल. दुर्गोत्सवात नऊ दिवस दांडिया खेळण्यास परवानगी मिळावी, स्टॅण्डींग दोन स्पीकर (डीजे हाफसेट) लावू द्यावेत, अशी आमची प्रमुख मागणी आहे. राज्य शासनाने कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ‘ज्ञान-मंदिरे’ खुली करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला असून दुर्गोत्सवातही नियमांमध्ये शिथीलता आणावी व दुर्गोत्सव विसर्जनाच्या प्रत्येक दुर्गोत्सव मंडळाला पाच ढोल-ताशांना परवानगी देवून तरुणाईला दिलासा द्यावा, असेही राजपूत म्हणाले.





