भुसावळ शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला शस्त्र तस्कर

जिवंत काडतुसासह आरोपी जाळ्यात : जंक्शनची वाटचाल उमर्टीच्या वाटेवर
भुसावळ : शहरात गेल्या 24 तासात दोन शस्त्र तस्करांना पकडण्यात पोलिस प्रशासनाला यश आले असून त्यांच्याकडून प्रत्येकी एक कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी शहर पोलिसांनी प्रभाकर हॉलजवळून एका संशयीतांकडून गावठी पिस्टल जप्त केल्यानंतर मध्यरात्री बाजारपेठ पोलिसांनीही एका संशयीताकडून कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले.
शहर पोलिसांनी आवळल्या शस्त्र तस्कराच्या मुसक्या
शहरातील प्रभाकर हॉलजवळ एक संशयीत गावठी कट्ट्यासह येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी कर्मचार्यांनी नितीन समाधान इंगळे (29, समाधान नगर, गुरुद्वाराजवळ, भुसावळ) यास मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व शंभर रुपये किंमतीचे काडतूस जप्त करण्यात आले. पोलिस शिपाई सोपान पाटील यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.
