आमदार हरीभाऊ जावळे शेतकर्यांविषयीचे सजग नेते

रावेरातील सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन
रावेर : आमदार हरीभाऊ जावळे हे शेतकर्यांविषयीचे सजग नेते असून संसदेत ते नेहमीच केळी असेल वा अन्य प्रश्न असतील त्या विषयी ते नेहमीच बाजू मांडतात शिवाय ते माझे चांगले सहकारी असल्याने महाराष्ट्रात मुद्दाम मी रावेरात पहिली सभा घेतली असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. छोरीया मार्केटच्या प्रांगणात गुरुवारी त्यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
मोदी है तो मुमकीन है
मोदी है तो मुमकीन है, असे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले की, 370 कलम हटविण्यासाठी व तीन तलाकला फक्त विरोध हा काँग्रेसने केला कारण त्यांच्या वोट बँक व फतवे सर्व बंद होतील म्हणून विरोध करीत होते. महाराष्ट्रात ज्या वेळी आघाडीचे सरकार होते त्यावेळी डी कंपनीचे राज्य होते, त्यांना कमुणी हात लावत नव्हते त्यामुळे गरीबांना योजनांचा लाभ मिळत नव्हता, असा घणाघाती टोलाही त्यांनी हाणला. काँग्रेसच्या आघाडी सरकारने गेल्या 60 वर्षात जे काम केले नाही ते काम फक्त पाच वर्षात या भाजप सेनेच्या युतीच्या सरकारने केले आहे कारण याला डबल इंजिन गाडी आहे. केंद्रात मोदी व राज्यात फडणवीस त्यामुळे विकासाची गंगा सुरू आहे. राज्यात पूरपरिस्थिती झाली असताना राहुल गांधी आले होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशावर संकट येईल त्यावेळेस राहुल गांधी उभा राहणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा
राज्यातील महायुतीचे सरकाराने पाच वर्ष सुशासन दिले. केंद्रात मोदी सरकार निवडून दिले. त्याचप्रमाणे राज्यात प्रगतीसाठी राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार निवडून द्या तसेच केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आल्याने डबल इंजिन लागून राज्याची प्रगतीकडे होईल. यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी देऊन दिलासा देण्याचे काम देवेंद्र सरकारने केले आहे. केंद्रात भाजपा महायुतीचे स्थिर सरकार असून राज्यात पण भाजपा महायुतीचे स्थिर सरकार निवडून आल्यास राज्यात विकासासाठी केंद्रातून निधी प्राप्त होवून राज्याचा कायापालट होणार असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अॅड.रोहिणी खडसे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, राजेंद्र फडके, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोळे, उद्योजक श्रीराम पाटील, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, पल्लवी महाजन, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, हिरालाल चौधरी आदी उपस्थित होते.
