दीपनगरात गोळीबार ! कंत्राटदार बचावला

व्यावसायीक स्पर्धेतील वाद विकोपाला : झटापटीमुळे गावठी कट्टा व मॅग्झीन पडली खाली : आरोपीला पोलिसांकडून अटक
भुसावळ : दोन कंत्राटदारांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर एका कंत्राटदाराने दुसर्या कंत्राटदारावर थेट गावठी कट्ट्यातून गोळी झाडली मात्र सुदैवाने नेम चुकल्याने कंत्राटदार बचावले तर याचवेळी दोघांमध्ये झालेल्या झटापटीनंतर कट्ट्यासह मॅग्झीन खाली पडली. गुरुवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास ही घटना दीपनगरातील वसाहतीमध्ये घडली. भुसावळातील पाच जणांच्या हत्येनंतर राज्याच्या पटलावर भुसावळ चर्चेत आले असतानाच पुन्हा गोळीबाराचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. दीपनगरातील अॅश कंत्राटदार मुकेश शैलेंद्र तिवारी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अॅश वाहतूक कंत्राटदार दीपक मधुकर हतोले (38) यांना तालुका पोलिसांनी अटक केली.
भुसावळात अवतरतेय ‘बिहारराज’ !
भुसावळात पाच दिवसांपूर्वीच पूर्व वैमनस्यातून खरात कुटुंबीयातील चार सदस्यांसह अन्य एकाची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच गेल्या 48 तासात शहर व बाजारपेठ पोलिसानी दोन गावठी कट्ट्यांसह दोन जिवंत काडतुसे तसेच दोन आरोपींना अटक केली तर ही घटना विस्मरणात जात नाही तोच पुन्हा दीपनगरातील ठेकेदारावर कट्टा रोखण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भुसावळातील पोलिस प्रशासन गुन्हेगारी रोखण्यात सपशेल अपयशी ठरले असून शहरात बिहारराज तर अवतरू पाहत नाही ना? असादेखील प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनातून उपस्थित होत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी धडक मोहिम राबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नमस्कार करीत रोखला कट्टा व झाडली गोळी
दीपनगरातील राखेची वाहतूक करणारे बडे कंत्राटदार मुकेश शैलेंद्र तिवारी (45, मूळ रा.कल्याण) हे दीपनगर वसाहतीतील एम- 29/2 या इमारतीत राहतात. गुरुवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास ते तयारी करीत असतानाच संशयीत आरोपी तथा कंत्राटदार दीपक मधुकर हातोले (48) यांनी बेल वाजवल्यानंतर तिवारी यांनी परीचीत व्यक्ती असल्याने दरवाजा उघडला. यावेळी ा यांनी नमस्कार करीत त्यांना हॅपी दसराही म्हटले व त्याचवेळी तिवारी यांच्या घराच्या खिडकीबाहेर फटाक्यांची मोठी लड लावण्यात आल्याने मोठा आवाज येताच काय झाले म्हणून तिवारी खिडकीकडे धावले व ते माघारी वळताच हातोले यांनी त्यांच्यावर गावठी कट्टा रोखला व तिवारी यांनी समयसूचकता दाखवत गावठी कट्टा हिसकावण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी एक गोळी सुटली मात्र तिवारी यांना ती लागली नाही तर हातोले यांच्या हातातील कट्टा व त्यातील मॅग्झीन खाली पडले तर तिवारी यांच्या मानेसह हातावर मात्र काहीसे खरचटल्याने ते किरकोळ जखमी झाले.
घटनास्थळावरून गॉगलसह कट्टा जप्त
दीपनगर वसाहतीत ठेकेदारावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड तसेच तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी गावठी कट्टा, मॅग्झीन व झाडलेल्या गोळीची रीकामी पुंगळी तसेच आरोपी हातोले यांच्या बुटसह गॉगलही जप्त करण्यात आला. घटनास्थळावर ठसे तज्ज्ञांसह पाचारण केल्यानंतर त्यांनी ठसे टिपले.
खूणगाठ बांधूनच आला आरोपी
बडे कंत्राटदार मुकेश तिवारी यांना संवण्याच्या उद्देशानेच आरोपी दीपक मधुकर हातोले गुरुवारी सकाळी दीपनगर वसाहतीत दाखल झाले. ओळख न पटण्यासाठी त्यांनी डोक्यात हेल्मेट परीधान केले शिवाय गावठी कट्ट्यातून फायरींग झाले तरी त्याचा आवाज बाहेर न येण्यासाठी तिवारींच्या घराबाहेर फटाके फोडण्यात आले त्यामुळे तिवारींना ठार मारणे हाच आरोपीचा उद्देश यातून दिसून आला. या गुन्ह्यात आरोपीचा आणखी साथीदार असण्याची दाट शक्यता आहे. घटनास्थळावरून आरोपी पसार झाला मात्र तालुका पोलिसांच्या पथकाने त्यास निंभोर्यातून अटक केल्याचे पोलिस उपअअधीक्षक गजानन राठोड म्हणाले.
गोळीबार नाही -पोलिस उपअधीक्षक
दीपनगर वसाहतीत गोळीबार झाला नसल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दिली. ते म्हणाले की, गावठी कट्टा व काडतूसासह मॅग्झीन जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याने आत्ताच काही सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले.
